हैद्राबाद : तेलगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले. हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना यकृत आणि किडनीचा आजार होता. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
काही वर्षांपासून वेणू माधव हे राजकारणातही सक्रीय होते. त्यांनी तेलगू देसम पक्षासाठी निवडणूक प्रचारही केला होता. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ट्वीट करत वेणू माधम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. वेणू माधव यांच्या निधनाने संपूर्ण टॉलिवूडमध्ये शोकाकूल वातावरण आहे. वेणूचे चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वहात आहेत.