वाहन क्षेत्रातील मंदी सुरूच

सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्यांकडूनही उत्पादन कपात

पुणे – जीएसटी परिषदेने वाहनावरील जीएसटी कमी केला नसला तरी केंद्र सरकारने कंपनी करात मोठी कपात केली आहे. मात्र, तरीही वाहन विक्रीत वाढ होत नसल्यामुळे वाहनांचे सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून उत्पादन कपात सुरूच आहे. “बॉश’ या कंपनीने तिसऱ्या तिमाहीत प्रत्येक महिन्यात 10 दिवस उत्पादन कपात जाहीर केली आहे.

या कंपनीची पुणे, नाशिक, मुंबईसह देशात 18 उत्पादन केंद्रे आहेत. त्यामुळे या प्रश्‍नाचे स्वरूप किती गंभीर आहे याचा अंदाज येऊ शकतो. या कंपनीने शेअर बाजाराला कळलेल्या माहितीत म्हटले आहे की, ऑक्‍टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये आम्ही प्रत्येक महिन्यात 10 दिवस उत्पादन बंद ठेवणार आहोत. हे 3 महिने भारतात उत्सवाच्या काळात येतात हे विशेष.

मागणी कमी असल्यामुळे आम्ही हे उत्पादन कमी करीत आहोत. या कंपनीची देशात 11 उत्पादन केंद्रे आणि 7 संशोधन आणि विकास केंद्र आहेत. त्या सर्व उत्पादन केंद्रात या तिमाहीत 30 दिवस उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. केवळ भारतातच मागणी कमी झालेली नाही तर, इतर देशातही मागणी कमी झाल्यामुळे आमची निर्यातही कमी होणार असल्याचे या कंपनीचे अधिकारी व्ही. के. विश्‍वनाथन यांनी सांगितले.

भारतातील बहुतांश वाहन कंपन्यांच्या विक्रीत गेल्या 1 वर्षापासून एकतर्फी घट होत आहे. ती कमी करण्यासाठी कंपन्या आणि सरकारने बरेच प्रयत्न केले असूनही याला पुरेसे यश मिळालेले नाही. रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर 9 वर्षांच्या निचांकी पातळीवर आहेत. त्याचबरोबर बॅंकांनी कर्ज उठाव वाढावा यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. मात्र, तरीही वाहनांना फारशी मागणी नसल्यामुळे वाहन कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. त्याचा परिणाम वाहनांचे सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरही होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.