संतपीठ ही भोसरीसाठी गौरवाची बाब : उबाळे

आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

भोसरी – भोसरी विधानसभा मतदासंघात होत असलेले संतपीठ हे भोसरीकरांसाठी गौरवाची बाब असून देहू आळंदीच्या मध्यावर असलेल्या टाळगाव चिखली होत असलेल्या या संतपीठामुळे महाराष्ट्रभरातून अध्यात्माचे ज्ञान मिळविण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेच्या शिरूर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे आयोजित बैठकीत सुलभा उबाळे बोलत होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या की, श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रभरातून विद्यार्थी अध्यात्माचे ज्ञान मिळविण्यासाठी येतात. पिंपरी चिंचवड महापालिकेने संतपीठाची उभारणी करण्याचे ठरविल्याने या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. संतपीठाच्या इमारतीचे नकाशे व आराखडे तयार करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आली आहे. संतपीठाकरीता इमारतीचा विस्तृत नकाशा व आराखडा तयार झाला असून महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत परवानगी घेण्यात आली आहे. संतपीठाची इमारत तळमजला अधिक पाच मजले अशी असेल. एकूण बांधकाम क्षेत्र 13161.71 चौरस मीटर राहणार आहे. एकूण चार उद्वाहक नियोजित आहेत. दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा असेल. संतपीठात एकूण 48 वर्ग खोल्या, तीन कार्यालय, सात प्रयोगशाळा, तीन संगणक कक्ष, दोन सभागृह, संगीत तथा वाद्य कक्ष असेल. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, विद्युत अग्निशमन व्यवस्था असेल, असे सुलभा उबाळे यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी चिंचवड परिसराला अध्यात्मिक व संत साहित्याचा तसेच संगीत कलेचा प्रगल्भ वारसा लाभला आहे. संतांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक शिक्षणासह संत साहित्य, संगीत, कला आदीचे शिक्षण देणारी संस्था निर्माण व्हावी अशी वारकरी सांप्रदायाशी संबंधित नागरिकांची मागणी होती. आमदार महेश लांडगे यांनी भोसरी “व्हिजन 20-20′ अंतर्गत संतपीठाची संकल्पना हाती घेतली. त्यातून टाळगाव चिखली येथे महाराष्ट्रातील पहिले संतपीठ उभारले जात आहे. चिखलीत संतपीठाचा पाया रोवण्याचे काम यातून झाले असल्याचे उबाळे यांनी सांगितले.

शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले की, श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदीला संतांचा वारसा लाभला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे संतपीठ हा नवीन पिढीसाठी एक प्रकारचा वारसा असून त्यातून संस्कृति जपण्याचे पाऊल टाकले गेले आहे. चिरकाल लोकांच्या स्मरणात राहिल असा हा संतपीठ प्रकल्प असल्याचे आल्हाट यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)