पुणे – देशभरात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. शिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात आता भारताने विशेषत: पुणे शहराने मोठी झेप घेतली आहे. येथील “ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) संस्थेने स्वदेशी आणि सर्वाधिक जलद वेगाने इलक्ट्रिक वाहने चार्ज करणारे 100 केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जरची निर्मिती केली आहे. त्याचे अनावरण अवजड उद्योगमंत्री डॉ. महेन्द्रनाथ पांडेय यांच्या हस्ते चाकण येथील केंद्रात करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती
“एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई, संयुक्त सचिव डॉ. हनीफ कुरेशी, “एआरएआय’चे अध्यक्ष राजेंद्र पेटकर, वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे.
मोबिलिटी रीसर्च सेंटर सुरू होणार
“एआरएआय’च्या ताकवे जि. पुणे येथील मोबिलिटी रिसर्च सेंटरचे ई-भूमिपूजन, एआरएआय व एआरएआय एएमटीआयएफ (ऍडव्हान्स मोबिलिटी अँड ट्रान्सफोर्मेशन इनोव्हेशन फाउंडेशन) या अंतर्गत विविध संस्थासोबत सामंजस्य करार, “एआरएआय’मध्ये होणारी 1000 वी क्रॅश चाचणी आदी विविध कार्यक्रमही यावेळी झाला.
डॉ. पांडेय म्हणाले…
भारताला सन 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल आणि सन 2070 पर्यंत नेट झीरो इमिशन करणारा देश बनवण्याचे प्रयत्न
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेपूर्वीच साध्य
पेट्रोलियम, रस्ते आणि परिवहन, अवजड उद्योग या मंत्रालयांतर्गत एकत्रितपणे 22 हजार पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणी सुरू
“हायड्रोजन मिशन’संदर्भात देखील सरकारने मोठे निर्णय घेतले
“एआरएआय’ने विकसित केलेला चार्जर महत्त्वाची भूमिका पार पाडेल. भारतातील कुशल मनुष्यबळ हे जागतिक दर्जाचे असून, आता वाहनउद्योग क्षेत्रात भारताची प्रगती महत्त्वपूर्ण आहे. आधी आयात करणारा आपला देश स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीत अव्वल आहे. मात्र, यावरच न थांबता त्याची निर्यात वाढवण्यावर आपण भर देत आहोत.
– डॉ. महेन्द्रनाथ पांडेय, अवजड उद्योगमंत्री