आळंदी – येथील प्रदक्षिणा रस्त्यावरच मुबंई फुलवाले धर्मशाळे समोर एक मद्यपी दारूच्या नशेत रस्त्यावर झोपलेला होता. रस्त्यावरच झोपलेल्या या मद्यपीमुळे या रस्त्यावर वाहनधारकांना त्याचा अडसर निर्माण होत होता. याची तत्काळ दखल घेत वाहतूक पोलीस तिथे आले व त्या मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या मद्यपीला तेथील नागरिकांच्या सहकार्याने उचलून पदपथावर एका बाजूला ठेवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली.
आळंदीमध्ये चाकण चौक, मरकळ चौक, चावडी चौक, नदी घाट परिसरात पद्ममावती रस्ता, सिद्धबेट परिसर व वडगाव रस्त्यावर सुद्धा मद्यपी मद्यधुंद अवस्थेत पडलेले असतात. नदीघाट परिसरात विशेषतः वैतागेश्वर मंदिर घाटपरिसरात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या मद्यपींची भांडणे सुरू असतात.
यामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांनादेखील या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः नदीघाटावर मद्यपींचा उपद्रव जास्त प्रमाणात सुरूच असतो. रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नदीघाटावर अनेक मद्यपी झोपलेले असतात. त्यामुळे नदीघाट परिसरात पालिका व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.