पुसेगाव (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान जवळ येऊ लागल्याने प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार बॅनर, जाहिराती, जाहीरनामे, प्रत्यक्ष भेटीगाठी या पठडीतील नियोजनाबरोबरच अनेक युक्त्या, मार्गांचा वापर करत आहेत.
निढळ परिसरात आता “वासुदेव’ या लोककलेचा आधार घेतला जात आहे. या वासुदेवांनी निवडणूक प्रचारात रंगत आणली आहे.
एकेकाळी वासुदेव हा ग्रामीण जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग होता. पूर्वी सकाळी देवाची गाणी म्हणत वासुदेव संपूर्ण गावाला जागे करायचा; परंतु काळाच्या ओघात ही लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. गावात वासुदेव येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी या लोककलेचा वापर निवडणूक प्रचारात होताना दिसत आहे. बुध, ता. खटाव येथील सचिन महाजन व त्यांची वासुदेवाच्या लोककलेच्या व गाण्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार करत आहेत.
या अनोख्या प्रचारामुळे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. याची चर्चा सोशल मीडियावरही आहे. त्याचबरोबर उमेदवार आपल्या प्रचाराचे व्हिडिओ बनवून मतदारांना पाठवत आहेत.
उमेदवारांच्या घरातील, गोतावळ्यातील महिला घरोघरी जाऊन, तेथील महिलांना हळदी-कुंकू लावून प्रचार करत आहेत. चौकाचौकात निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगत आहेत.