पुणे – 4 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिकांकडून राज्यभर अनेक ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण केलं. पुणे शहरातही मनसेकडून ठिकठिकाणी हनुमान चालीसा व आरती करण्यात आल्या. मनसेच्या या आंदोलनावेळी पुन्हा एक नाव चर्चेत राहीले ते म्हणजे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे. त्याचे कारण असे की मनसेच्या या आंदोलनात वसंत मोरे कुठेच दिसून आले नाहीत.
पुण्यात आंदोलना दरम्यान पोलिसांनी मनसेच्या अनेक नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली मात्र यामध्ये वसंत मोरे कुठेच दिसून आले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे कुठे असणार असा सर्वांना प्रश्न पडला. त्यांच्या नॉट रिचेबलची चर्चाही शहरात चांगलीच रंगली. त्यानंतर वसंत मोरे यांनी या सर्व चर्चावर पडदा टाकला. त्यांनी स्वत: एक फेसबुक पोस्ट करत यावर खुलासा केला. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे अशी फेसबुकवर पोस्ट टाकून मोरे यांनी माहिती दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशा नंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार…! अशी फेसबुक पोस्ट मोरे यांनी टाकली आहे.