पुणे – भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवरून आता चांगलेच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये या जागेवरून सुप्त संघर्ष सुरु झाला होता, आता पुणे लोकसभा मतदार संघात मनसेकडून देखील तयार सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनसेचे फायब्रान्ड नेते वसंत मोरे हे स्वतः पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत.
नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पार पडला. यासाठी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार फ्लेक्सबाजी करत राज ठाकरेंना जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वसंत मोरे समर्थकांनी लावलेल्या फ्लेक्स वर मोरे यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला होता. मोरे यांची खासदारकीची महत्वकांक्षा यापूर्वी देखील समोर आलेली होती.
नुकतंच मोरे यांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी,माझा पक्ष वाढो.. पुढच्या वर्षी दर्शनाला येताना पुण्याचा खासदार होऊन यायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मोरे यांनी ही इच्छा बोलून दाखवली. यावरूनच आता मोरे यांनी पुणे लोकसभेसाठी शड्डू ठोकलाय हे निश्चित झालं.