पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा नारा देत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश दिले होते. मात्र पुण्याचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेपासून स्वत:ला वेगळं केलं होतं. तेव्हापासून वसंत मोरे कायम चर्चेत आहेत.
या घटनेनंतर वसंत मोरे यांच्याकडे असलेलं शहराध्यक्षपद काढण्यात आलं. त्यामुळे मोरे नराज असल्याची चर्चा जोरात सुरू झाली होती. याच कालावधीत मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफरही आल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोरे यांना फोनही आला होता. मात्र मोरे यांनी आपण मनसेतच राहणार असल्याच स्पष्ट केलं होतं.
दरम्यान राज ठाकरे ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देखील वसंत मोरे या महाआरतीच्या कार्यक्रमाला हजर नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे पक्षांतर करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मोरे यांनी फेसबुकवर स्पष्टीकरण देत या चर्चांवर पडदा टाकला होता.
संजय राऊतांची भेट
वसंत मोरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची नुकतीच एका लग्नात भेट झाली. शिवसेनेच्या शहराध्यक्षांमुळे राऊत आणि मोरे यांची भेट झाली. या भेटीनंतर वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत राऊत यांनी मोरे यांचं ठाण्यातील भाषण ऐकल्याचं म्हटलं. शिवाय ‘भेटू’ असं म्हणत निरोप घेतला. राऊत यांच्या भेटू या शब्दामुळे मोरे यांची शिवसेनेसोबत जवळीक वाढली का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.