Vasant More । Sharad Pawar : मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी पुण्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची काही भेट घेतली तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय राहिले आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे वसंत मोरे यांनी मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र करत, पक्षातून काढता पाय घेतला.
दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे ते आज शरद पवार गटात प्रवेश करतात का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात दाखल झाले तेव्हा वसंत मोरे यांना पत्रकारांनी आज शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न केला.
त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं नाही. आपण फक्त शरद पवार यांना भेटायला आलो असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. पण तरीसुद्धा राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या कार्यालयात हालचाली वाढताना दिसत आहेत. यावेळी शरद पवार गटाचे अनके बडे नेते देखील उपस्थित होते. । Vasant More । Sharad Pawar
यावेळी माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “माझा पक्षप्रवेश नाही.. मी खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांना भेटायला आलो आहे. मी लपवणार नाही. आता निवडणुका आहेत. मी निवडणूक लढवू इच्छूक आहे. शरद पवारांनी बोलावलं म्हणून मी आलो. माझा आज पक्षप्रवेश नाही.
निवडणुका लागू द्या. अजून निवडणूक लागलेली नाही. आता पुण्याचं मैदान मारायचं आहे म्हणून आलेलो आहे. पण अजून त्याबाबतीत कोणतीही चर्चा नाही. मी अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदारसंघात राहतो. आमची मैत्री आजची नाही. अनेक वर्षांची आहे” अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली. मात्र, आगामी काळात वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. । Vasant More । Sharad Pawar