“वारी लाल परीची’ अवतरली साताऱ्यात

एस.टी.ची कारकीर्द एका रथात, विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रतिसाद
सातारा  –
सर्वांच्या लाडक्‍या एस. टी. बसच्या निर्मितीला 71 वर्षे पूर्ण झाले. दरम्यानच्या कालावधीत एस.टी.च्या सेवेमध्ये अनेक बदल झाले. बदलांचा इतिहास सांगणारी क्षणचित्रे व “वारी लाल परीची’ या घोषवाक्‍यासह चित्ररथ मंगळवारी साताऱ्यात दाखल झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चित्ररथ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चित्ररथासाठी वापर करण्यात आलेली बस मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सातारा बसस्थानकात दाखल झाली.

यावेळी ज्येष्ठ नागरिक गोपाळ कृष्ण धोंडवड (रा. गजवडी ता. सातारा) यांच्या हस्ते फित कापून चित्ररथातील प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय कुलकर्णी, पी. एस. भिंगारे, दिपाली कुलकर्णी, सचिन भुजबळ यांच्यासह आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “वारी लाल परीची’ हा चालता फिरता चित्ररथ साकारण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठ्या परिवहन सेवेचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील प्रमुख 50 शहरांमध्ये चित्ररथ जाणार आहे.

मागील काही वर्षामध्ये एस.टीच्या बांधणी आणि सेवेमध्ये अनेक अमुलाग्र बदल झाले. शिवशाही सेवा, विठाई सेवा, रातराणी, एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट, विनाथांबा असे अनेक बदल झाले. बदलांचा इतिहास क्षणचित्रे, माहिती फलक आणि इतर माध्यमांव्दारे चित्ररथामध्ये मांडण्यात आली आहेत. दरम्यान, सातारा बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी तसेच विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी देखील चित्ररथाची पाहणी केली. यावेळी एसटीची निर्मिती आणि आजपर्यंतचा प्रवास उप्रकमाच्या निमित्ताने समजला असे सांगत भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी चित्ररथाच्या माध्यमातून साकारलेल्या उपक्रमाचे स्वागत केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.