– माधव विद्वांस
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे नामवंत नाट्य व चित्रपट अभिनेते सतीश दुभाषी यांचा आज स्मृतिदिन. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे नामवंत नाव म्हणजे सतीश दुभाषी. पु.लं.चे “ती फुलराणी’ या नाटकात त्यांनी भक्ती बर्वे यांच्याबरोबर केलेला अभिनय प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिला. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1939 रोजी कारवार येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. पु. ल. देशपांडे त्यांचे मामेभाऊ होते. त्यांचे आजोबा, वामन मंगेश दुभाषी हे कवी होते.
70च्या दशकात पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या “ती फुलराणी’ नाटकात भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. “ती फुलराणी’ हे पु. ल. देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या “पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. 29 जानेवारी 1975 रोजी फुलराणीचा पहिला प्रयोग झाला. भक्ती बर्वे व सतीश दुभाषी यांच्या जुगलबंदीमुळे हे नाटक खूपच गाजले.
“ती फुलराणी’च्या प्रयोगात ते कायम व्यस्त राहिले. त्यामुळे त्यांना इतर फार नाटके करता आली नाहीत. तरीही त्यांनी सुमारे 27 नाटके व 4 चित्रपटांत काम केले. “बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटातही काम केले. नेपोलियन, पार्टी, शांतता कोर्ट चालू आहे, कन्या सासुरासी जाये, कोंडी, चक्रव्यूह या नाटकांचेही शेकडो प्रयोग झाले. “ती फुलराणी’नंतर ते वसंत कानेटकर यांच्या “बेईमान’ या नाटकातही चंदरच्या भूमिकेतील प्रभाकर पणशीकर आणि धनराजच्या भूमिकेतील सतीश दुभाषी यांच्यातील जुगलबंदी रंगली होती. यामध्ये दुभाषी खलनायकाच्या भूमिकेत होते. त्यांनी खलनायकही उत्तम साकारला होता.
आजच्या पिढीला सतीश दुभाषी फारसे माहीत नाहीत. पण बरेचदा टीव्ही वाहिन्यांवरून कधीतरी एखादा जुना चित्रपट लागतो आणि दुभाषींचे दर्शन होते. त्यांनी काही मराठी चित्रपटांतही काम केले. “बाळा गाऊ कशी अंगाई’, “सिंहासन’, “चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला.
डॉ. जब्बार पटेल यांच्या “सिंहासन’मध्ये अरुण सरनाईक, दत्ता भट, श्रीराम लागू, निळू फुले या सारख्या दिग्गजांबरोबर केलेला डिकास्टाची छोटी भूमिकाही त्यांनी उत्कृष्टपणे वठविला. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हणून ते प्रसिद्ध झाले. “अंमलदार’, “शांतता कोर्ट चालू आहे’, “नटसम्राट’ आणि “सूर राहू दे’ तसेच सर्वात गाजलेले म्हणजे “ती फुलराणी’ या नाटकांमधील दुभाषी यांचे काम अजरामर झाले आहे. दुभाषी यांचे 12 सप्टेंबर 1980 रोजी निधन झाले.