मार्केट यार्ड -मार्केट यार्ड परिसरातील वाहनतळावर मच्छी मार्केट उभारण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीने मंजूर केलेला प्रस्ताव स्थगित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना केली आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
याबाबत आमदार मिसाळ म्हणाल्या की, ज्या ठिकाणी मच्छी मार्केट आणि पोल्ट्री व्यवसायास जागा देण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला त्या भागात दाट लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिकांचा मच्छी मार्केटला तीव्र विरोध आहे. याबाबत बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती; परंतु त्यानंतरही ही जागा या व्यवसायासाठी देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता, त्यामुळे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते.
याच प्रश्नी आज मार्केट यार्ड येथील व्यापऱ्यांनी तसेच सकल सर्वधर्म पुणे परिवाराच्या वतीनेही प्रचंड मोर्चा बाजार समितीवर नेला होता. जैन समाजातील मान्यवरांकडूनही याला विरोध कायम ठेवला होता, त्याची दखल घेत फडणवीस यांनी बाजार समितीचा हा प्रस्ताव स्थगित करण्याची सूचना थेट अब्दुल सत्तार यांना केली आहे. याबाबत केवळ “प्रभात’ने वृत्तांकन केले होते. या वृत्तांची कात्रणेही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली होती, असेही मिसाळ यांनी सांगितले.