माधव विद्वांस
प्रसिद्ध ब्रिटिश नाटककार, समीक्षक, पत्रकार आणि समाजवादाचे खंदे प्रचारक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 26 जुलै 1856 रोजी आयर्लंडमधील डब्लिन येथे झाला. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांची आई विभक्त झाली. त्यामुळे त्यांचे बालपण खूपच खडतर गेले. त्यांचे औपचारिक शिक्षण फारच थोडे झाले होते.
वडिलांबरोबर राहून डब्लिनमध्येच दोन वर्षे कारकुनी केल्यावर ते आपल्या आईकडे लंडन येथे गेले. त्यांची आई गायिका होती. त्यामुळे शॉ पियानो वाजविण्यास शिकले. शिक्षण नसले तरी स्वप्रयत्नाने त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास करून बहुश्रुतपणा प्राप्त केला होता.
लंडनमध्ये आले तेव्हा ते अतिशय लाजाळू होते. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात गुणवत्ता वाढवत, स्वत:चे एक धीट, बेधडक व्यक्तिमत्त्व त्यांनी घडविले. त्यांनी संगीतावर लेख लिहिणे सुरू केले. पत्रकारितेबरोबर ते कादंबऱ्याही लिहू लागले. मात्र, प्रकाशकांकडून त्यांच्या कादंबऱ्या नाकारल्या जात होत्या, कमाईही फारशी नव्हती.
अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत ते लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळांतून वावरू लागले आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना प्रभावीपणे करून देऊ लागले. अशाच एका मंडळात त्यांना त्यांचा आयुष्यभराचा मित्र “सिडनी वेब’ यांची गाठ पडली.
वर्ष 1882 मध्ये ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ज्ञ “हेन्री जॉर्ज’ यांच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळले आणि कालांतराने फेबिअन सोसायटी या लंडनमधील समाजवादी संघटनेचे एक आधारस्तंभ बनले. इंग्लंडमध्ये समाजवाद आला पाहिजे पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक, आर्थिक सुधारणांमधून येईल अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती.
विवेक आणि मानवतावाद यावर शॉ यांचा अढळ विश्वास होता आणि तो त्यांच्या लेखनातूनही तो जाणवतो. सामाजिक-राजकीय तसेच वाङ्मयीन क्षेत्रांत सक्रिय असणाऱ्या लोकांमधील अनेक बुद्धिमान, सर्जनशील स्नेही त्यांना मिळाले. त्यातील काहींनी शॉ यांच्या कादंबऱ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध केल्या. याच वेळी शॉ नाट्यलेखनाकडे वळले.
शॉ यांच्या काळी पश्चिमी जगातील नाटककारांवर इब्सेन यांचा मोठा प्रभाव होता. शॉ यांच्यावर देखील त्यांचा प्रभाव होता व त्यामुळे “क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम’ हे त्यांचे इंग्रजी भाषेतील इब्सेनवरचे पहिले पुस्तक होय. “इब्सेनिझम घोस्ट्स’ हे नाटक लंडनच्या रंगभूमीवर आणणाऱ्या इंडिपेंडन्ट थिएटर सोसायटी’ या संस्थेने शॉ यांच्याकडे नाटकाची मागणी केली आणि शॉ यांनीही विल्यम आर्चरच्या सहकार्याने पूर्वी लिहिलेले एक नाटक सुधारून
आणि “विडोअर्स हाउसेस’ हे नाटक वर्ष 1892 मध्ये हे नाव देऊन त्या संस्थेला दिले. शोषणावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये शोषित अजाणतेपणे कसे सहभागी झालेले असतात, हे शॉ यांनी या नाटकांतून तसेच इतर नाटकांतूनही मांडले आहे.
“द फिलॅंडरर’ नाटकात त्यांनी तत्कालीन “फॅशनेबल’ बुद्धिमंतांना आपले लक्ष्य केले. त्यांनर शॉ यांनी साठांहून अधिक नाटके व कादंबऱ्याही लिहिल्या. वर्ष 1925 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला. हर्टफर्डशरमधील एअर सेंट लॉरेन्स या गावी राहत असताना तेथेच 2 नोव्हेंबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले.