भांबवलीचा वजराई धबधबा पर्यटकांसाठी सज्ज

कास – कास पुष्प पठारापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला भांबवली वजराई धबधब्याला पर्यटन स्थळ घोषित केले असून या पर्यटन स्थळाला “क” दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून नावारूपाला आलेल्या आणि तब्बल १८४० फुट उंचीवरून तीन टप्प्यात कोसळणारा भांबवलीचा वजराई धबधबा गेल्या काही वर्षांपासून प्रकाशझोत आला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून पुरेशा दळवळणाच्या सुविधांअभावी दुर्लक्षित राहिलेला आणि घनदाट चोहीकडून गर्द जंगलाने व्यापलेला भांबलीचा वजराई धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू लागला आहे. परंतु या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा घनदाट जंगल व्याप्त आणि  घसरड्या पायवाटामधून जातो.त्यामुळे धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग अतिशय धोकादायक होता. वजराई धबधब्याला पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे वनविभागाच्या पुढाकाराने या धबधब्याच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नांना यश आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वजराई धबधब्यावर पर्यटन विकासाच्या दृष्टीने सोयीसुविधांचे काम सुरू आहे.

भांबवलीच्या वजराई धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्गावरील जंगलव्याप्त आणि घसरड्या उताराच्या ठिकाणी पायरी मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जवळपास एक किलोमीटरचा पायरी मार्ग आणि रेलिंगचे काम यातुन केले जाणार असुन यातील बहुतांश काम पुर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. यंदाच्या पर्यटनाच्या हंगामात या ठिकाणी स्वच्छतागृह, तिकीट केबिन, परिसराची माहितीचे दिशादर्शक आणि सुचना फलक, प्रथमोपचार किट, अत्यावश्यक फोन नंबर्सची लिस्ट, विविध दुर्मिळ जातींच्या झाडांच्या माहिती फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच वॉच टॉवर ठोसेघर धबधब्याप्रमाणे प्रेक्षक गॅलरी ही कामे मंजूर असून पुढील हंगामा पर्यंत पुर्ण केली जाणार आहेत.

दरम्यान, वनविभागाच्या माध्यमातून भांबवलीच्या वजराई धबधबा या पर्यटन स्थळाचा कायापालट केला जात आहे. यंदाच्या हंगामात स्थानिक वन समिती आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रवेश शुल्क दर निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदापासून पर्यटकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती वनविभागाचे अधिकारी आणि वन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कास पुष्प पठार,  ठोसेघर धबधबा, कास तलाव यांच्या पाठोपाठ वजराई धबधबा यामुळे पर्यटनाला बहर येणार आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या प्रयत्नामुळे पर्यटकांना दुर्गम डोंगराळ भागातुन सुरक्षित धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी पाय-या आणि रेलिंगची सोय केली आहे. पावसाळ्यानंतर लहान मुलांनसाठी विशेष आकर्षण म्हणुन “म्हातारीचा बुट”  बनविण्यात येणार आहे. पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकीटे अस्ताव्यस्त फेकुन कचरा करू नये. तसेच वन्य प्राणी, जीव जंतू, झाडे यांची हानी करू नये. संयुक्त वनव्यवस्थापन समिती वनविभागाच्या मदतीने आवशक सोयी सुविधा पुरवणार आहे.

– रविंद्र बळीराम मोरे, पर्यटन प्रमुख, सह्याद्री पठार विभाग विकास संघ


भांबवली वजराई धबधब्याचा  परिसर अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या आहे. त्यामुळे या ठिकाणी भेटी देणाऱ्या पर्यटकांनी अतिउत्साह टाळावा. इतर कोणत्याही मार्गाने धबधब्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न न करता तयार केलेल्या मुख्य मार्गाने पर्यटनाचा आनंद घ्यावा. वनविभागाच्या  माध्यमातून या पर्यटन स्थळाचा कायापालट केला जात आहे. वन विभाग पर्यटन विकासासाठी कायम तत्पर असुन वेळोवेळी आवश्यक पाठपुरावा केला जात आहे.

– शितल राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.