जाहीरनाम्याच्या पूर्ततेकडे बाजार समितीची वाटचाल

प्रभाकर घार्गे यांचे प्रतिपादन
वडूज – अडीच वर्षापूर्वी झालेल्या वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने राष्ट्रवादीकडे सत्ता सोपविली. यावेळी दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांच्या पूर्तीकडे संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

वडूज येथील बाजार समिती आवारातील चाळीस नवीन गाळ्यांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, प्रा. अर्जुनराव खाडे, युवा नेते नंदकुमार मोरे, सभापती रविंद्र सानप, उपसभापती डॉ. प्रकाश पाटोळे, माजी सभापती सी. एम. पाटील, सुनील घोरपडे, राजेंद्र मोरे, महेंद्र नलवडे, ज्ञानेश्‍वर जाधव, शशिकांत देशमुख, विजय काळे, सत्यवान कांबळे, किरण देशमुख, शेखर म्हामणे, गिरीश शहा, तुकाराम यादव, देविदास फडतरे, भिकू कंठे यांची उपस्थिती होती.

घार्गे म्हणाले, संस्था ताब्यात आली. त्यावेळी संस्थेला 23 लाखांपेक्षा जास्त देणी होती. पहिल्या वर्षी झालेल्या सभापती घोरपडे यांच्या कालावधीत पणन महासंघाची ही देणी भागविण्यात आली. दुसरे सभापती सी. एम. पाटील यांच्या कालावधीत इमारत दुरूस्ती, रंगरंगोटी, वृक्षारोपण, बैठक व्यवस्था आदी कामे करण्यात आली. त्यांच्या कार्यकालात नवीन भूखंड व गाळ्यासंदर्भात पणन महासंघाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला.

विद्यमान सभापती सानप, उपसभापती डॉ. पाटोळे व सहकाऱ्यांच्या काळात नवीन गाळ्यांचा प्रस्ताव मंजूर झाला. नजिकच्या काळात वडूज येथील गाळे व भूखंडाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. नजिकच्या काळात पुसेसावळी, पुसेगाव, कलेढोण येथील उपबाजार आवाराच्या जागाही विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. सभापती सानप यांनी स्वागत केले.

त्याचबरोबर गाळयांच्या प्रस्ताव मंजुरी व इतर तांत्रिक बाबींसंदर्भात सविस्तर माहिती दिली. उपसभापती डॉ. पाटोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सचिव शरद सावंत, उपसचिव अशोकराव पवार, हणमंतराव मदने, श्री. चव्हाण, श्री. सर्वगोड, नीलेश सुतार, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here