मंडळाचे आधारस्तंभ माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांची माहिती
वाघोली, दि. 13 (प्रतिनिधी) – येथील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या गेलेल्या वाघेश्वर तरुण मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिरातच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याची माहिती मंडळाचे आधारस्तंभ माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली.
वाघेश्वर तरुण मंडळाच्या गणेश उत्सवाचे यंदाचे 61 वे वर्ष आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मंडळाने या वर्षी रामभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार नागरिकांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे, तसेच सात हजार लोकांना रोग प्रतिकारक्षमता वाढवण्याच्या गोळ्यांचे वाटप केले आहे.
वाघोलीतील साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, कोलते पार्क, रोज गार्डन सोसायटी या भागातील लहान-मोठ्या गणेश मंडळानी देखील मंडप न घालता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.