शिक्रापूर – सध्या भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना श्रीक्षेत्र वढु बुद्रुक ते कोरेगाव भीमा रस्त्यावरिल झेड एफ कारखान्याजवळील असलेल्या पुलावर नदीच्या पाण्याचा फुगारा आल्याने सलग दुसऱ्या दिवशी वढु बुद्रुक ते कोरेगाव भीमा या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात सर्रास संपर्क तुटत असल्याने मोठा पूल उभारण्याची मागणी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगावसह मावळ तालुक्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीपच न दिल्याने भीमा, भामा, इंद्रायणी नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या आहेत. भामा आसखेड धरणातून 18527 क्युसेक तर चासकमान धरणातून 17 हजार 950 क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले असल्याने भीमा नदीच्या पाण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. काल सायंकाळी कोरेगाव भीमा येथील संत रोहिदास नगर, स्मशानभूमी, दशक्रिया घाट परिसरात पुराचे पाणी पोहोचले होते तर वढू बुद्रुक-कोरेगाव भीमा रस्त्यावरिल झेड एफ कारखान्याजवळील ओढ्यातही पाण्यात वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर तब्बल पाच ते सहा फूट उंचीपर्यंत पुलावरून पाणी वाहू लागले असल्याने वढु बुद्रुक ते कोरेगाव भीमाचा संपर्क रात्री तुटला होता. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला बॅरीकेटस् लावुन वाहतूक वळविली होती; परंतु आज पुन्हा भीमा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वढु बुद्रुक-कोरेगाव भीमाचा सलग दुसऱ्या दिवशी संपर्क तुटला. यावेळी राजेंद्र गव्हाणे व संतोष गव्हाणे यांनी पाण्यात अडकलेल्या अनेक वाहनांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यास मदत केली.
ओढ्यावरील पुलाची उंची वाढवा
गेली अनेक वर्षे झेड एफ येथील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी होऊनही प्रशासन याकडे दखल घेत देत नसल्याने पावसाळ्यात वाहतूक बंद होऊन प्रवाशांचे व वाहनांचेही मोठे नुकसान होत असल्याने आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे या रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्यासाठी मागणी केली असल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.