सोमेश्वरनगरमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून राबवला उपक्रम
इतरही 500 जनावरांसाठी राबवली उपाययोजना
उरलेल्या जनावरांसाठी लवकरच होणार लसीकरण
वाघळवाडी (वार्ताहर) – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अर्थसाहाय्य असलेली लाळ्या खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सोमेश्वर कारखाना परिसरात राबविण्यात येत असून या मोहिमेदरम्यान सुमारे 1500 बैल आणि इतर 500 जनावरांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती वाणेवाडीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक पवार दिली.
कारखाना परिसरात उसाची वाहतूक करणाऱ्या बैलजोडी व इतर पाळीव जनावरांना ही लाळ्या खुरकत लस पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. गेल्यावर्षी या भागातील जवळपास पाच हजार जनावरांना लाळ्या खुरकत या रोगाने ग्रासले होते. त्यामुळे अनेक जनावरे दगावली होती तर काही जायबंदी झाली होती. या व्यतिरिक्त सोमेश्वरनगर परिसरातील अनेक गावात व वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांकडील जनावरांनाहीही लस देण्यात आली असून, राहिलेल्या सर्व जनावरांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
शासनाने लसीची उपलब्धता करून दिली असल्याने या रोगापासून जनावरांना होणारा धोका टळला आहे. लसीकरण मोहिमेत पशुसंवर्धन विभागाचे डॉ. दीपक पवार, डॉ. धनंजय पोळ, डॉ. महेश शेजाळ, डॉ. म्हस्के यांच्यासह नंदन दुध डेअरीचे पशुमित्र डॉ. रणजित जगताप, डॉ. विजय भंडलकर खासगी पशुधन पर्यवेक्षक डॉ. अनिल लगड, डॉ. गणेश रणवरे, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. रफिक पठाण, डॉ. संतोष जाधव यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. ऊसतोडणी मजुरांच्या बैलांना आणि इतर जनावरांना लसीकरण करण्यासाठी शेतकी विभाग आणि कारखाना प्रशासनाचे सहकार्य लाभले.