दोन दिवस पुरेल एवढीच पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे लस

लसीकरणाला लागणार ब्रेक : अवघे 18 हजार डोस शिल्लक

पिंपरी – करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लसीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्‍यता आहे. सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त 18 हजार डोस शिल्लक आहेत. हा साठा अवघ्या दोन दिवसांत संपणार आहे.

शासन आदेशानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या 4 लाख 57 हजार इतकी आहे. याशिवाय हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील सर्व नागरिकांनाही ही लस देण्यात येत आहे. 16 जानेवारीला शहरामध्ये करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सुरूवात झाली.

सुरूवातीला यामध्ये हेल्थ वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून शहरातील हेल्थ वर्कर यांच्यासोबतच फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यास सुरुवात केली. तसेच हेल्थ वर्कर यांना दुसरा डोस देण्यास सुरूवात केली. 1 मार्चपासून 60 वर्षावरील नागरिक व गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली.

तर आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 लाख 20 हजार 853 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये काहींना फक्त पहिला डोस दिला आहे. शहरात 1 एप्रिलला 63 हजार 866 लस शिल्लक होत्या. त्यामध्ये कोव्हॅक्‍सिन 990 डोस होते. तर कोव्हिशिल्डचे 62,876 डोस होते. आज (बुधवारी) शहरामध्ये 18 हजार डोस शिल्लक होते. त्यामध्ये फक्त कोव्हिशिल्ड लस शिल्लक आहे. तर कोव्हॅक्‍सिनचा साठा संपला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.