सातारा -जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड लसीकरणाचा सावळा गोंधळ कायम आहे. ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांची लसीकरण कर्मचाऱ्यांना दमदाटी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात बुधवारी मोठा गोंधळ झाला. अवघ्या पंधरा मिनिटात कुपन संपल्याचे सांगितल्याने रांगेतील नागरिकांनी एकच गदारोळ करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
त्यातच हे प्रकरण हातघाईवर गेल्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे वातावरण शांत झाले.
जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू आहे. करोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यासाठी दोन स्वतंत्र केंद्रे जिल्हा रुग्णालयात अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
या दोन्ही केंद्रांवर लस घेण्यासाठी रोजच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेक सातरकारांचा तर कोव्हिशिल्डसाठी मोठा आग्रह असल्याने ज्या केंद्रावर ही लास उपलब्ध आहे तिथे अधिक गर्दी होत असल्याने वादविवाद होऊ लागले आहेत.
मंगळवारी दि. 6 रोजी सायंकाळी कोव्हिशिल्डच्या 700 लस जिल्हा रुग्णालयाकडे आल्या होत्या. त्यापैकी एका लसीकरण केंद्रावर 450 तर दुसऱ्या केंद्रावर 240 लसीकरण करण्याचे नियोजन केले होते.
हे लसीकरण बुधवारी होणार असल्याने पहाटेपासून दोन्ही केंद्रांवर नागरिकांची गर्दी होती. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लसीकरण केंद्रातील कर्मचारी कूपन घेऊन आले.
मात्र, त्यानंतर 15 मिनिटांत कूपन संपल्याची घोषणा झाली. रांगेत उभे राहूनही ज्यांना टोकन मिळाले नाही, ते लोक आक्रमक झाले. यामुळे एकच गदारोळ उडाला.
नेमके याचवेळी एकाच नागरिकाला दोन टोकन देण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली. कूपन लवकर कशी संपली, अशी विचारणा काहींनी केल्याने गोंधळ उडाला.
यानंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला. रांगेतील काही नागरिक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांत वादावादी सुरू झाली.
एका कर्मचाऱ्याने “मला मारणार आहात का,’ असे म्हटल्याने हा वाद आणखी वाढला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी केल्यावर सारे शांत झाले.
तोंडे पाहून होते लसीकरण
जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांवर लस देण्यासाठी देण्यात येणाऱ्या कुपन वाटपात मोठा घोटाळा केला जात असल्याचा आरोप बुधवारी पहाटे काही सातारकरांनी केला. हे सर्व जण रांगेत उभे होते.
मात्र, लसीकरण केंद्रात काम करणारे कर्मचारी तोंडे पाहून कुपन देत असल्याचा आणखी एक गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. कारंजकर यांच्यासह येथील लसीकरण कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली