पुसेगाव (प्रतिनिधी)- शिक्षक अष्टपैलू असावा, विद्यार्थीप्रिय असावा व विषय तज्ज्ञ असावा. समाजासाठी आदर्श घालून देणारा असावा. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून संस्कारक्षम व आदर्श नागरिक घडवण्यासाठी तो कर्तव्यपरायण असावा .असेच काहीसे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य सुधाकर माने. त्यांनी शिक्षणक्षेत्र आवडीने व ओढीने स्वीकारले. ते एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, असे मत राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक पतसंस्थेचे संस्थापक ता. का. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
पुसेगावच्या श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री हनुमानगिरी हायस्कूल ज्युनियर कॉलेज व्होकेशनल विभागाचे प्राचार्य सुधाकर माने यांचा त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने आयोजित सेवापूर्ती समारंभात सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुंदरगिरी महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे भाग्य लाभणे ही पूर्व पुण्याची गोष्ट आहे, असे स्पष्ट केले.
यावेळी फलटणच्या डायटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, व्होकेशनल विभागप्रमुख प्रा. जे. बी. जाधव, माजी प्राचार्य मधुकर कोथमिरे, पर्यवेक्षक आर. एन. जाधव, चंद्रकांत माने, शंकर चव्हाण, घुगरे, देवयानी लावंड, श्रीमती खांडे, सौ. भारती माने, शरद पंडित, रामानंद पुजारी, मुख्याध्यापक मोहनराव गुरव, राजेंद्र जगदाळे तसेच हिंदी अध्यापक मंडळाच्या विविध अध्यापकांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास राष्ट्रभाषानुरागि पतसंस्थेची सर्व संचालक पदाधिकारी सदस्य, चेअरमन हणमंत सूर्यवंशी, शहानवाज मुजावर, इक्बाल मुल्ला, शिवाजीराव खामकर, रामानंद पुजारी, मारूती शिवदास, सुनंदा शिवदास, विश्वनाथ नलवडे, जगदीश धुळप, फैय्याज संदे, मुरलीधर साळुंखे, किसन शेडगे, सौ. हेमलता फडतरे, लावंड, श्री. व सौ. माने, सौ. रूपाली गुरव, सौ. भूपाली जाधव तसेच पालक, शिक्षक पाहुणेमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती प्राचार्य सुधाकर माने यांनी आपल्या मनोगतात श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सेवाकाळात केलेले मार्गदर्शन केले, सेवेची संधी दिल्याबद्दल संस्थेचे ऋण व्यक्त केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद दिले . शंकर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सौ. माधुरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उमेशचंद्र डुबल यांनी आभार मानले.