लंडन- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेत दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हंगेरीच्या मार्टन फ्युस्कोव्हिक्सवर 6-3,6-4,6-4 असा सहज विजय मिळविला. तसेच कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हनेदेखील उपांत्य फेरीत प्रवेश करत आगेकूच कायम ठेवली.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जोकोविचने पहिला सेट अवघ्या 42 मिनिटांत जिंकला. त्याने 5-0 अशी आघाडी मिळवित मार्टनवर दबाव आणला. तथापि, मार्टनने 3-5 अशी आघाडी कमी केली. परंतु जोकोविचने 6-3 असा सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मार्टनने जोकोविचला प्रत्येक गुणासाठी कडवा संघर्ष दिला. हा सेट 4-4 असा बरोबरीत असताना जोकोविचने सलग दोन गुण मिळवित सामन्यावर पकड मिळविली.
यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये जोकोविचने आपला अनुभव पणाला लावत 29 वर्षीय मार्टनला 6-4 अशी मात देत विजयावर शिक्कामोर्तब केला.
कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हने कॅरेन कचानोवला संघर्षपूर्ण सामन्यात पाच सेटमध्ये 6-4, 3-6, 5-7, 6-1, 6-4 असे पराभूत केले. दरम्यान, शापोवालोव्हला शुक्रवारी गतविजेत्या आणि अव्वल मानांकित नोवाक जोकोविचशी सामना करावा लागणार आहे.
फेडररचे आव्हान संपुष्टात
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे आव्हान अखेर आज संपुष्टात आले आहे. प्रथमच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने हा सामना 3-6, 6(4)-7(7), 6-0 असा जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, मिश्र दुहेरीत भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. चौदाव्या मानांकित जीन ज्युलियन-रॉजर आणि आंद्रेजा क्लॅपॅक या जोडीने 6-3, 3-6, 11-9 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.