पुणे – पुणे जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून आतापर्यंत 43 लाख 25 हजार जणांना डोस देण्यात आले आहेत, तर लस द्यावी लागणाऱ्यांची संख्या 57 लाखांवरून 81 लाखांच्या पुढे म्हणजे 81 लाख 90 हजार इतकी गेली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लोकसंख्येच्या आकडेवारीचा अभ्यास करून ही संख्या निश्चित करण्यात आली आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भाग अशा एकूण लस लाभार्थ्यांची लोकसंख्या 1 कोटी 17 लाख इतकी आहे. त्यापैकी 18 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लाभार्थ्यांची पुण्यातील संख्या सुमारे 57 लाख होती.
ही जुन्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार होती. मात्र, केंद्र सरकारने नव्या निकषानुसार ही आकडेवारी गोळा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नवी आकडेवारी काढण्यात आली असून, ती तब्बल 24 लाखांनी वाढल्याचे दिसून आले. लस लाभार्थ्यांची नवी संख्या ही एकूण लोकसंख्येच्या 74 टक्के आहे. या 81.90 लाख लाभार्थ्यांपैकी 33 लाख 31 हजार लाभार्थ्यांना पहिला डोस मिळाला आहे. तर, 9 लाख 93 हजार लाभार्थ्यांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
लाभार्थी संख्या वाढली म्हणजे ही नवीन लाभार्थ्यांमध्ये वाढ झाली नाही तर, सरकारने दिलेल्या नवीन नियमावलीनुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या आहे. याशिवाय पल्स पोलिओ सारख्या विविध उपक्रमांमधून काढलेल्या “नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’ च्या माहितीनुसार ही लाभार्थी संख्या दिसून येते.
– डॉ. संजय देशमुख, सहायक संचालक