पुणे – करोनासाथीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स तसेच वैद्यकीय सेवांसह इतर अत्यावश्यक सेवांची जबाबदारी असलेल्यांसाठी आता महापालिकेकडून 24 तास लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी 5 केंद्रांवर तीन शिफ्टमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. या कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजातून वेळ मिळत नसल्याने तसेच पुन्हा करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने या कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रशासनाच्या आदेशानुसार, वैद्यकीय सेवांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण देशात 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे तर त्या व्यतिरिक्त करोना नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण 1 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, लसीकरण केंद्राची मर्यादित संख्या आणि कार्यालयीन कामकाजाच्या नियोजनामुळे महापालिका, पोलीस तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण मागे पडले आहे.
तर शहरात सध्या सुरू असलेल्या केंद्रावर या कर्मचाऱ्यासह, शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील इतर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे केंद्रावर गोंधळ होऊन फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाला फटका बसत आहे, परिणामी या कर्मचाऱ्यांसाठी रात्रीच्या शिफ्टमध्येही लसीकरण होणार आहे.
संचारबंदीची अडचण नाही
शहरात महापालिकेकडून रात्री 11 नंतर मर्यादीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातून, अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाइन वर्कस यांना वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी रात्री या कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
लसीकरण केंद्र आणि वेळापत्रक
शहरात सुतार दवाखाना, मगर दवाखाना, येरवडा येथील राजीव गांधी दवाखाना, मंगळवार पेठेतील कमला नेहरू दवाखाना तसेच सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यात ही लसीकरण केंद्र असतील. येथे सकाळी 8 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 10 व रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यात, पहिल्या दोन शिफ्टमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण होणार असून रात्रीच्या शिफ्ट फक्त फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण होणार आहे.