ऋतुजा शिंदे
पुणे – वर्ष 2019-20 च्या अहवालानुसार संपूर्ण देशाचा आढावा घेतल्यास बलात्काराच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. शिवाय कोरोना संचारबंदीतही बलात्कारासह घरगुती हिंसाचाराच्या घटना आपण ऐकल्या. खर तरं या प्रश्नासाठी अनेक कायदे आहेत. मात्र असं असूनदेखील स्त्री अत्याचाराची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी ठरते आहे. यावर उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय मार्शल आर्टमध्ये सक्रिय असलेल्या अपर्णा राजवत यांनी वर्ष 2018 मध्ये “मिशन पिंक बेल्ट’ या उपक्रमाला सुरुवात केली. आजवर त्यांनी दीड लाख महिलांना ‘सेल्फ डिफेन्स’ ( स्वरक्षक) चे ट्रेनिंग दिले असून या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ने घेतली आहे. याविषयी दै. प्रभातशी त्यांनी संवाद साधला…
“पिंक बेल्ट मिशन’ ही संकल्पना काय आहे?
जेव्हा निर्भया हत्या प्रकरण झाले तेव्हा मी लंडनमध्ये होते आणि या प्रकरणानंतर मी आपल्या देशातील प्रत्येक महिलांसाठी लढा देण्याचं ठरवलं . वर्ष 2018 पासून “पिंक बेल्ट मिशन’च्या माध्यमातून ‘सेल्फ डिफेन्स’ या उपक्रमाला सुरुवात केली आणि लाखो महिलांना “सेल्फ डिफेन्स’ची कला शिकवली. मात्र केवळ सेल्फ डिफेन्स पुरेसे नाही, हे जेव्हा कळले तेव्हा या यंत्रणेची संकल्पना सुचली. मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचे आहे. यासंदर्भात आम्ही सरकारकडे मागणी देखील करणार आहोत.
सध्या आम्ही I want my pink belt असा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून सर्वच स्त्री-पुरुषांना या मोहिमेत सहभागी व्हायला सांगत आहोत. जेव्हा 50,000 स्वाक्षऱ्या होतील तेव्हा या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सरकारशी संपर्क साधणार आहोत, जेणेकरुन लोकांचे आयुष्य बदलण्याचे ध्येय “मिशन पिंक बेल्ट’मधून साध्य होईल.
“ही यंत्रणा बनवण्याची गरज का पडली?
गेले आठ महिने मुंबईमधील IT टीम या संकल्पनेसाठी काम करीत आहे. ही यंत्रणा कशी असणार आणि कोणकोणत्या गोष्टींचा यात समावेश असणार या सर्व बाबी तयार आहेत. सरकारच्या माध्यमातून पोलीस, वैद्यकीय सुविधा, त्यात असणाऱ्या सिम कार्डसाठी मोबाईल शॉपीशी ते कनेक्ट केले जाईल. सेल्फ डिफेन्सच्या बळावर आपण स्वतःला वाचवू शकतो, मात्र जर हल्ला करणाऱ्यांची संख्या ही चारपेक्षा अधिक असेल तर ते थोडे अशक्य होते. अशा स्थितीत ही यंत्रणा प्रत्येक मुलींसाठी, महिलांसाठी, मुलांसाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. बलात्कार हा gender प्रॉब्लेम नसून ही एक सामाजिक समस्या आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आपल्याबाबत काहीतरी वाईट होणार आहे, हे जेव्हा समजते तेव्हा आपण आपल्या जवळील व्यक्तींना कॉन्टॅक्ट करतो. मात्र बऱ्याच वेळा यात वेळ जातो आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. अशा पद्धतीची अप्रिय घटना घडल्यास अर्धा अर्धा तास ती व्यक्ती तिथेच पडून असते. तिला लवकर वैद्यकीय सुविधा मिळत नाही आणि तिला जीव गमवावा लागतो. या सर्वांवर तोडगा म्हणून या यंत्रणेची निर्मिती गरजेची आहे; जेणेकरून दुर्घटना होण्याआधी पोलीसमध्ये सिग्नल देऊन हा अनर्थ टाळला जाऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा लवकर उपलब्ध होते. घरगुती हिंसाचाराच्या घटनांसाठीही ही यंत्रणा सक्षम आहे.
ही यंत्रणा काम कशी करणार?
या उत्पादनाच्या संकल्पनेचे डिझाईन बनवताना त्यात एक बटन असेल. हे बटन दाबल्यावर एक धोक्याची सूचना इतरांना पाठवली जाईल. ही सूचना जवळील पोलीस स्टेशनला पोहचेल. ही सुरक्षा यंत्रणा दीर्घकाळ टिकावी म्हणून तिला सिलिकॉन केसिंगचे आवरण असेल आणि तुमच्या gps लोकेशनच्या संबधित इतर कार्यानुरूप सुविधा असतील. यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही. यामध्ये अंतर्गत सेन्सरची सुविधा असेल, जे अत्यंत जोराचा धक्का बसल्यावर सक्रिय होतील. त्यामुळे हे उपकरण खेचण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपोआप एक धोक्याची सूचना पीडित व्यक्तीच्या ठिकाणासह पाठवली जाईल.
तंत्रज्ञान माहित नसलेल्या ग्रामीण भागातील महिलांचे काय?
यासाठी आम्ही प्रत्येक राज्यात कॅम्पेन चालवत आहोत मात्र तरीही तुम्ही सर्वांनी ही स्वतःची जबाबदारी मानून शक्य होईल तितके याबाबतीत लोकांना जागृत करणे गरजेचे आहे कारण आधी आपण एकमेकांसाठी उभे राहण्यासाठी शिकले पाहिजे. पिंक बेल्ट मिशन सर्व शंका दूर करण्यासाठी सक्षम आहे तुम्ही कधीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.
https://pinkbeltmission.org/iwantmypinkbelt/