- 28 हजार नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस
पिंपरी – महापालिका प्रशासनाने करोना लसीकरणाला वेग दिला असून आज (रविवारी) लसीकरणाने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरातील 28 हजार 819 नागरिकांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 2 लाख 74 हजार 530 जणांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिला व दुसरा डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 3 लाख 3 हजार 349 इतकी झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासकीय 71 आणि खासगी 29 अशा 100 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात आली. तर 1 मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील व्याधिग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना करोना लस टोचण्यात आली होती. तर 1 एप्रिल पासून 45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू आहे
शहरातील आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षे व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील अशा 2 लाख 74 हजार 530 जणांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 28 हजार 819 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. लस टोचून घेणाऱ्यांमध्ये 45 वर्षांपुढील नागरिक आणि ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. पहिला आणि दुसरा डोस असे 3 लाख 3 हजार 349 नागरिकांनी करोनाची लस घेतली आहे.
करोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. आरोग्य सेवकांमध्ये 23 हजार 889 जणांनी पहिला, तर 11 हजार 544 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाइन वर्करमध्ये 24 हजार 189 जणांनी पहिला, तर 6664 जणांनी दुसरा डोस घेतला.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये 1 लाख 16 हजार 65 जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील 7 हजार 776 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. 45 वर्षांपुढील 1 लाख 24 हजार 787 जणांनी पहिला डोस घेतला असून, त्यातील 2 हजार 843 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 74 हजार 530 जणांनी पहिला, तर 28 हजार 819 जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसराही डोस घेतला आहे.