डेहराडून – उत्तराखंड महिला कॉंग्रेस अध्यक्षा सरिता आर्या यांनी सोमवारी सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कॉंग्रेसला मोठा राजकीय हादरा बसला.
नैनितालच्या माजी आमदार असणाऱ्या सरिता यांनी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्या 2012 मधील निवडणुकीत नैनितालमधून विधानसभेवर निवडून गेल्या. मात्र, मागील निवडणुकीत त्या भाजपचे उमेदवार संजीव आर्या यांच्या विरोधात पराभूत झाल्या. काही महिन्यांपूर्वीच संजीव यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर संजीव यांनाच कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जाते. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी सरिता यांनी पक्षबदल केला. उत्तराखंडच्या सत्तेसाठी प्रामुख्याने भाजप आणि कॉंग्रेसमध्येच लढत होणार असल्याचे चित्र आहे.