फलटण, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघातील भूमिकेबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उद्या, दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजता लक्ष्मीविलास पॅलेस या आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर रामराजे आपली पुढील दिशा ठरवणार आहेत.
महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. या उमेदवारीला रामराजे गटाचा विरोध असून, त्यांनी ‘तुतारी’ हाती घ्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांमधून जोर धरू लागली आहे.
माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व रामराजे यांच्या उपस्थितीत मुंबईत फडवणीस यांच्या सागर बंगल्यावर नुकतीच बैठक झाली. रामराजे यांनी महायुतीचा धर्म पाळावा, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली होती. मात्र, स्थानिक कार्यकर्ते व मतदारसंघातील समविचारी नेत्यांशी चर्चा करून निर्णय देऊ, असे रामराजे यांनी सांगितले होते.
या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटणचे माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर रामराजे यांनी गुरुवारी (दि. 21) बोलावलेल्या बैठकीकडे माढा मतदारसंघासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांमधील लोकांचे लक्ष लागले आहे.