पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – पिंपरी- चिंचवड शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शासन व महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. परंतु शहरातील महत्त्वाची ठिकाणे आणि रस्ते तसेच चौक सध्या चर्चेचे विषय बनले आहेत. उपनगरांमधील बहुतांशी वॉइन आणि बिअरच्या दुकानांजवळील रस्ते, चौक तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागा मद्यपींचे अड्डे बनले आहेत. या सर्व गोष्टींकडे पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सध्या ओपन बारची संकल्पना शहरात वाढत चालली आहे. त्यामुळे उपनगरांतील संस्कृतीला गालबोट लागताना दिसून येत आहे.
स्पाइन रोड हा शहरातील महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावरील कृष्णा चौकात स्पाइन रोडच्या मधल्या जागेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना काळात भाजीमंडई उभारण्यात आली होती. त्यासाठी रस्त्याच्या मधल्या जागेची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या वतीने तेथे हॉकर्स झोनची निर्मिती करण्यासाठी साधारणपणे दहा ते बारा लाख रुपये खर्च करून सिमेंटचे ओटे बांधण्यात आले आहेत. तसेच लाइटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या लाइट लावण्यात येत नाहीत.
कृष्णा चौकात एक वाइन शॉप आहे. या वॉइन शॉपमधून दारू खरेदी करून बहुतांश नागरिक सकाळी अकरा ते रात्री दहा अकरापर्यंत अविरतपणे घोळका करून एकटे तर गटागटाने दारू पित बसलेले असतात. तसेच शरदनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हनुमान मंदिराच्या जवळ देखील सर्व्हिस रस्त्यावर बरेच मद्यपी दुकानातून दारू आणून भर रस्त्यात पित बसलेले असतात. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
परिसराचे विद्रुपीकरण
हॉकर्स झोनसाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून येथे सिमेंटचे ओटे व इतर व्यवस्था केली आहे. परंतु सध्या मद्यपी याचा वापर दारू पिण्यासाठी करत आहेत. फक्त दारू पिऊन ते जात नाहीत तर या परिसराचे विद्रुपीकरण करत आहेत. परिसरात दारूच्या बॉटल, पिण्यासाठी आणलेले ग्लास तसेच चकणा साहित्याचे लेबल तेथेच टाकून दिले जात आहे. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.
लहान मुलांच्या मनावर होतोय परिणाम
या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे स्पाइन रोडने येणाऱ्या नागरिकांना येथील मद्यपींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांबरोबर असलेल्या मुले या मद्यपींविषयी पालकांना प्रश्न करत आहेत. पालकांना त्यांना काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडत आहे. शरदनगर येथे तर हनुमान मंदिराच्या शेजारील रस्त्यावर झाडाच्या सावलीत बहुतांशी मद्यपी दारू पित बसलेले असतात. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांच्या मनावर परिणाम होत आहे.
प्लॅस्टिक गोळा करणारांचा आधार
या परिसरात मद्यपी जे कचरा करत आहेत. बॉटल टाकून देत आहेत. त्या काचेच्या बॉटल, प्लॅस्टिक बॉटल, ग्लास तसेच इतर साहित्य हे कचरावेचक गोळा करून घेऊन जात आहेत. त्यामुळे शेकडोने पडणाऱ्या दारूच्या बॉटल मात्र या कचरावेचकांमुळे दररोज गोळा केल्या जात आहेत. त्यामुळे परिसर साफ होत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या मार्गाने ये-जा करावी की नाही असा प्रश्न पडत आहे.
पोलीस प्रशासनाचा कानाडोळा
कृष्णा चौकातील वॉइन शॉपमधून दारू खरेदीकरून वर्दळीचा असलेला भाजी मार्केट चौक येथे स्पाइन रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत दिवसरात्र मद्यपी दारू पित बसलेले असतात. या चौकापासून काही मीटर अंतरावर साने पोलीस चौकी आहे. तसेच जवळच पोलीस लाइन क्वॉर्टर आहे. तसेच वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस देखील या चौकात असतात. परंतु प्रशासन कानाडोळा करत असल्याने शेजारीच मद्यपी भर रस्त्यातील मोकळ्या जागेत आणि सध्याच्या नियोजित हॉकर्स झोनमध्ये दारू पित बसलेले असतात. परंतु पोलीस एका शब्दाने काही बोलत नसल्याने येथील मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलीस आणि येथील वॉइन शॉपवाले यांचे तर काही साठेलोटे नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.