मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
स्थानिक परिसराचा विकास करण्यासाठी देण्यात येणारा निधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी दिला आहे. शिवाजी पार्क हे मुंबईमधील मोजक्या आणि सर्वात मोठ्या मोकळ्या जागेंपैकी एक असून त्याचे आकारमान २२.७ एकर इतके आहे. शिवसेनेचे शिवाजी पार्कसोबत एक खास नाते असून त्याला ऐतिहासिक वारसाही आहे.
आमदारांच्या या विकास निधीमधून प्रत्येक आमदाराला त्याच्या स्थानिक परिसरामधील कामांसाठी चार कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो. १९ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू शिवाजीपार्कच्या परिसरातील फुटपाथचा वापर करतात.
मात्र या ठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीमध्ये नसून त्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे . त्यामुळेच मी माझ्या आमदार निधीमधून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी देत आहे, असे म्हटले होते. सामान्यपणे एखाद्या कामासाठी आमदार २५ लाखांपर्यंतचा निधी देऊ शकतो. मात्र या प्रकरणामध्ये विशेष सवलतीअंतर्गत १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिल्यानंतर पाच महिन्यांनी मुंबई माहनगरपालिकेने या कामांसंदर्भात निविदा मागवल्या आहेत. सी रामचंद्र चौक ते वीर सावरकर मार्गावरील वसंत देसाई चौकादरम्यानच्या फुटपाथचे शुशोभिकरणासाठी या निवादा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये रोषणाई, लाइट बिलबोर्ड्स, पथदिवे, पुतळ्यांवरील स्पॉट लाइट्स, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाई आणि इतर रोषणाईची काम केली जाणार आहेत.