विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी
पिंपरी – करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह गुंडाळून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकमधून मृताचे अंतिम दर्शनही घेता येत नाही. त्यामुळे मृताच्या नातेवाईकाचे भावनिकदृष्टया समाधान होईल, याकरिता किमान मृत व्यक्तीचा चेहरा दिसेल, अशा प्रकारचे पारदर्शक प्लॅस्टिक वेष्टण वापरण्याची मागणी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.
शहरात करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. करोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा देह प्लॉस्टिक वेष्टणामध्ये बंद करुन नातेवाइकांच्या उपस्थित त्याच्यावर महापालिकेमार्फतच अत्यंसस्कांर केले जातात. यामध्ये करोनाबाधितांच्या मृतदेहाचा चेहरा सुध्दा त्यांच्या नातेवाइकांना पाहता येत नाही.
करोनाबाधित मृतदेहाचा कमीत कमी चेहरा तरी पाहिला जावा अशी नातेवाइकांची अपेक्षा असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही व करोनाबाधित मृतदेहाचा चेहराही नातेवाईकांना पाहता येईल, अशा प्रकाराचे प्लॅस्टीक वेष्टण उपलब्ध करता येईल का? याबाबत चाचपणी करण्यात यावी.