मार्क ईस्पर – संरक्षण सहकार्यविषयक आगामी वाटचाली संदर्भात विचार
वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान संरक्षण विषयक आगामी सहकार्याच्या मुद्दयांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर आपली चर्चा झाली असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांनी आज सांगितले. ईस्पर यांनी गेल्याच महिन्यात आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी ईस्पर यांनी राजनाथ सिंह यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली.
राजनाथ सिंह यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि आगामी काळात एकत्रितपणे करायच्या उपक्रमांबाबतही चर्चा झाली असल्याचे ईस्पर यांनी सांगितले. पेंटॅगॉन येथे पत्रकारांबरोबरच्या वार्तालापादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. मात्र राजनाथ सिंह यांच्याबरोबरच्या चर्चेचा अन्य तपशील त्यांनी दिला नाही.
जम्मू काश्मीरबाबतच्या भारताच्या भूमिकेचे ईस्पर यांनी कौतुक केले. तसेच जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याच्या भूमिकेचे समर्थनही केले. भारत आणि पाकिस्तान हे आपसातील मतभेदाचे मुद्दे परस्परांशी चर्चेद्वारे सोडवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली असल्याचे भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही सांगितले.