कोईंबतूर- राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूतील कोईंबतूर शहरात गुरूवारी पाच ठिकाणी छापे टाकले. राज्यातील कथित इस्लामिक स्टेट मॉड्यूल आणि श्रीलंकेतील इस्टर बॉम्बस्फोटांबाबत सुरू असलेल्या तपासणीचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी एनआयएने कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये इसिसशी प्रभावित असलेल्या एकाला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला मोहम्मद अझरूद्दीन हा श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी बॉम्बस्फोट करणाऱ्या झहरान हाशिमशी प्रभावित झाला होता. त्यानंतर एनआयने याप्रकरणी एक नवी तक्रार दाखल केली होती. सय्यद मोहम्मद बुखारी, हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निधी जमवल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली होती.
तसेच हे दहशतवादी भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. एनआयएने चेन्नईमजीस सय्यद बुखारीच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला. याव्यतिरिक्त हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन याच्याही घरावर छापे टाकण्यात आले.
एनआयएने टाकलेल्या छाप्यात 9 मोबाइल, 15 सिमकार्ड, 7 मेमरी कार्ड, 3 लॅपटॉप, 5 हार्डडिस्क, 6 पेन ड्राइव्ह, दोन टॅब, तीन सीडी आणि डिव्हीडी जप्त केल्या होत्या. याव्यतिरिक्त काही मासिके, बॅनर्स, पोस्टर्स आणि पुस्तकेही जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, केरळमध्ये असलेल्या इसिस मॉड्यूल्सचा श्रीलंकेतील हल्ल्यात सहभाग आहे किंवा नाही याच्या तपासात सुरक्षा यंत्रणा लागल्या आहेत. यापूर्वी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. तपासातून काही समोर आले नसले तरी इसिसशी निगडीत काही जणांनी श्रीलंकेतील दहशतवादी आदिलच्या काही फेसबुक पोस्ट शेअर केल्याचे समोर आले होते.
9 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या एका केसनुसार संशयित दहशतवादी चेन्नई आणि नागपट्टिणम जिल्हातील राहत असल्याची माहिती होती. याव्यतिरिक्त देशात अन्य ठिकाणी राहणारे लोकही या संघटनेशी निगडीत असून ते सरकारविरोधात कारवाया करण्याचा कट रचत होते. या दशतवाद्यांनी अंसारूल्ला नावाची संघटना तयार केल्याची माहिती समोर आली होती.
तसेच एका एजन्सीच्या रिपोर्टनुसार, श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झहरान हाशिम हा सोशल मीडियाच्या माध्यमातून केरळमधील इसिसशी निगडीत लोकांशी तीन वर्षांपासून संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. एनआयएने मोहम्मद आशिक, इस्माईल, शमशुद्दीन, जफर सादीक अली आणि शाहुल हमीदला अटक केली होती. रिपोर्टनुसार हे सर्वजण हाशिम आणि त्याच्या साथीदारांच्या संपर्कात होते. एनआयएने यांचाच शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले असल्याचे म्हटले जाते.