वीजपुरवठा तोडण्याचा वीज वितरण कंपनीचा इशारा
इस्लामबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा वीज वितरण करणाऱ्या कंपनीने दिला आहे. वीज बिलाचे लाखो रुपयांची थकबाकी झाल्यामुळे कंपनीने हा इशारा दिला आहे. देशाच्या आर्थिक टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या इम्रान खान यांच्यापुढे आणखी एक नामुष्कीचे संकट उभे ठाकले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाला वीज पुरवठा करणाऱ्या इस्लामाबाद इलेक्ट्रीक सप्लाय कंपनीने बुधवारी पंतप्रधानांच्या सचिवालयाला नोटीस बजावली आणि थकित वीज बिलाचा भरण त्बडतोब न केल्यास वीज पुरवठा तोडण्याचा इशारा दिला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसर पंतप्रधानांच्या कार्यालयाचे 41 लाख रुपयांचे बिल थकित आहे. पंतप्रधानांच्या सचिवालयाने गेल्या महिन्यातील 35 लाख रुपयांचे वीज बिलही भरलेले नाही. या संदर्भात कंपनीकडून सचिवालयाला वारंवार स्मरण करून देण्यात आले आहे. मात्र सचिवालयाकडून त्यावर काहीही प्रतिसाद दिलेला नाही. नियमाप्रमाणे सलग दोन महिन्यांचे वीज बिल न भरल्यास कंपनी आगोदर पूर्वसूचना देऊन वीज पुरवठा खंडीत करू शकते.
वीज बिलाची वसुली वेळेवर होऊ न शकल्यामुळे खासगी वीज निर्मिती कंपन्यांना वितरण कंपनीकडून थकित देयके दिली जाऊ शकलेली नाहीत. त्यामुळे वीज निर्मितीवरही विपरीत परिणाम संभवतो.
पाकिस्तानमधील वीज पुरवठा गेली अनेक वर्षे विस्कळीतच होता. त्यामध्ये यावर्षी सुधारणा झाली आहे. सरकारी विभागांकडून वीज बिल वेळेवर भरले न जाण्यामुळेच वीजेची निर्मिती घटली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानल 22 ते 24 हजार मेगावॅट वीजेची आवश्यकता असते. यामध्ये दरवर्षी 5 मेगावॅट वीजेची भर पडत असते. पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी 24 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केल्याचा दावा केला गेला होता.
मात्र “नॅशनल ट्रान्समिशन ऍन्ड डेस्पॅच कंपनी’ या सरकारी कंपनीकडून त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. मागणी आणि पुरवठा यातील तफावत 2013 साली 5 हजार मेगावॅट इतकी होती. 2018 साली ही तफावत 6 हजार मेगावॅटपर्यंत वाढली होती. वीजनिर्मिती क्षेत्रात 80 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याने वीज वितरण सुधारल्याचे उर्जामंत्री ओमर आयुब यांनी जूनमध्ये म्हटले होते.