‘क्‍युबा’वर अमेरिकेचे निर्बंध; मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप

हवाना – अमेरिकेने क्‍युबाचे अंतर्गत व्यवहार मंत्रालय आणि त्यांच्या नेत्यावर निर्बंध लागू केले आहेत. मानवाधिकाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत ट्रम्प प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत. ट्रम्प प्रशासनची मुदत जेमतेम चार दिवस बाकी असताना त्यांनी घातलेले हे निर्बंध बहुतांशी केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचे आहेत.

ही घोषणा करताना अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्हन म्युचीन यांनी म्हटले आहे की अमेरिका मानवाधिकाराच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून जगाच्या पाठीवर कोठेही या अधिकाराचे हनन झाले तर आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. क्‍युबाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने तेथील बंडखोर नेते डॅनियल फेरेरे यांना बेकायदेशीरपणे तुरूंगात डांबून त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार केले आहेत.

तसेच त्यांना वैद्यकीय मदतही नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. क्‍युबाच्या सरकारने आपल्या देशातील बंडखोरांना कायमच अमेरिकेचे हस्तक ठरवून त्यांना मोडीतच काढण्याचा उद्योग केला आहे. क्‍युबातील सरकार सोशालिस्ट तत्वांचे आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यातच अमेरिकेने क्‍युबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते राल कॅस्ट्रो यांच्यावरही निर्बंध लागू केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.