‘टीचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा’; शेतकरीविरोधी कृषी कायदे आणि कामगार विरोधी श्रम संहिताची ‘होळी’

कोल्हापूर – मोदी सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी गेल्या पन्नास दिवसांपासून दिल्लीच्या सर्व सीमावर प्रचंड धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनात १२० हून अधिक शेतकरी शहीद झाले तरी मोदी सरकारने गांभीर्याने निर्णय घेण्याऐवजी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले आहे.

सुप्रीम कोर्टाने या कायद्याच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. परंतु समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक केली असल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे. शेतकऱ्यांवरील हा अन्याय व दडपशाही मान्य करणे शक्य नाही. म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी या किसान आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. कारण बहुसंख्य शिक्षक हे शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे करून घेणे शक्य नाही.

या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून टीचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा या समितीच्या वतीने आज दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर काळ्या कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. तसेच मोदी सरकारने कामगार हिताच्या विरोधात सर्व कामगार कायदे बदलून चार श्रम संहिता मंजूर केले आहेत.

ब्रिटिश राजवटीपासून कामगार चळवळीने लढून मिळवलेले कामगार कायद्यांचे लाभ काढून घेण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्याविरोधात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशभर आंदोलन सुरू आहे. २६ नोव्हेंबर दोन हजार वीस च्या देशव्यापी संपात कोट्यावधी कामगारांनी सहभाग घेतला. परंतु मोदी सरकारने त्यांच्या मागण्या बाबत ब्र ही काढलेला नाही. कृषी कायद्याबरोबरच चार श्रम संहितांची होळी करण्यात आली.

या आंदोलनात प्रा.डॉ.सुभाष जाधव, प्रा.डॉ.डी.एन.पाटील, राजेश वरक, सी.एम.गायकवाड, दत्तात्रय पाटील, महादेव साबळे, महेश सूर्यवंशी, हेमलता पाटील, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, युवराज सरनाईक, बळवंत कांबळे, राजेंद्र पाटील, सुभाष धादवड, शकील भेंडवडे, संतोष कदम, सि.टी. केंगले, नियाज नदाफ, अनिल शेलार, विनोद गायकवाड यांसह आदी शिक्षक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.