बीजिंग – चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गेंग गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असून अद्याप त्यांच्या ठावठिकाणा कोणालाही समजलेला नाही. अलीकडेच, किन गेंग यांना चीनच्या परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून किन गेंग यांच्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड आणि माहिती काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गेंग यांच्या बेपत्ता होण्यामागील रहस्य वाढले आहे.
किन गेंग एक महिन्यापेक्षा जास्त काळ दिसलेले नाहीत. सुमारे आठवडाभरापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, खराब प्रकृतीमुळे किन गेंग सार्वजनिक ठिकाणी दिसत नाही. किन गेंग यांच्याबाबत अनेक अफवा उठत आहेत. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे चीन प्रकरणाचे तज्ज्ञ इयान जॉन्सन म्हणतात की, चीनमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींनी असे बेपत्ता होणे सामान्य आहे. कधीकधी यास काही महिने आणि वर्षे देखील लागू शकतात. किन गेंग आरोग्याच्या कारणास्तव अनुपस्थित असल्याचा दावा जॉन्सन यांनी जोरदारपणे नाकारला.
किन गेंग यांची डिसेंबर 2022 मध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. परंतु ते त्यांच्या पदावर एक वर्ष देखील पूर्ण करू शकले नाहीत. त्यापूर्वीच त्यांना पदावरून हटवून माजी परराष्ट्र मंत्री वांग यी यांना पुन्हा परराष्ट्र मंत्री करण्यात आले.
अनेक जुन्या संदर्भांनुसार चीनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी बेपत्ता होणे सामान्य आहे. यामध्ये माजी मुख्य प्रोटोकॉल अधिकारी झांग कुनशेंग, उद्योगमंत्री जिओ याकिंग आदींच्या नावांचा समावेश आहे.