पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती. तसेच, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक देखील मंचावर उपस्थित होते. मात्र, मोदींच्या या दौऱ्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होत असला तरी प्रत्यक्षात मंचावर वेगळाच प्रसंग बघायला मिळाला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आयोजित कार्यक्रमाच्या मंचावर मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहात मोदींचं स्वागत केलं. त्या रांगेमध्ये शरद पवार हे देखील उपस्थित होते. मोदी मंचावर दाखल होताच ते सरळ शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुलले होते.
शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यांच्याशीही त्यांनी हात मिळवला. पुढे गेल्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरासमोर आले तेव्हा त्यांनी अजित पवारांशी हात तर मिळवलाच शिवाय त्यांच्या हातावर हलकेच थोपटलं. त्यानंतर अजित पवार यांनी सूचक हास्यही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर वळले आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना अशा प्रकारे थोपटणं आणि त्यानंतर अजित पवार यांनी स्मित हास्य करणं याचे अनेक अर्थ सध्या राजकीय वर्तुळात काढले जाऊ लागले आहेत. सध्या हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून, नेटकरी देखील यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाच कार्यक्रमात शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकणं आणि दुसऱ्याच वेळी मोदींनी अजित पवरांच्या हातावर थोपटनं यांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.