“लष्कर-ए-तोयबा’, “लष्करे जांघवी’ यांच्यावर अमेरिकेची पुन्हा बंदी

वॉशिंग्टन – अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटना “लष्कर ए जांघवी’ आणि “लष्कर ए तोयबा’यांना विदेशी दहशतवादी संघटना म्हणून नव्याने संबोधले आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या “फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स’ च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून या संघटनांवर नव्याने ठपका ठेवण्यात आला आहे.

“फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स’च्या बैठकीमध्ये पाकिस्तानला “ग्रे लिस्ट’ मध्ये ठेवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. दहशतवादी संघटनांच्या सध्याच्या स्थितीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आढावा घेतला आणि “लष्कर ए जांघवी’ आणि “सिनाई पेनिंसुला’ या संघटनांवरही आपले निर्बंध कायम ठेवले आहेत. “लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेलाही विदेशी दहशतवादी संघटना म्हणून नव्याने संबोधण्यात येणार आहे. “इमिग्रेशन ऍन्ड नेशनालिटी’ कायद्यानुसार या संघटनांच्या म्होरक्‍यांवर असलेली बंदी यापुढेही कायम राहणार आहे.

“लष्कर ए जांघवी’,”लष्कर-ए-तोयबा’,”जैश रिजाल अल तारीक अल नशाबंदी’,”जमातूल अन्सारूल मुसलमीन फी बिलादिस सुदान’,”अल नुसराह फ्रंट’,”कंटिन्युटी आयरिश रिपब्लिकन आर्मी’ आणि “नॅशनल लिबरेशन आर्मी’ या संघटनांना नव्याने विदेशी दहशतवादी संघटना म्हणून संबोधण्यात आले आहे.

अन्य देशात दहशतवादी संघटनांना चिथावणी देणे, दहशतवादी हल्ले घडवून आणणे तसेच घातकी साधन सामग्रीच्या आधारे घातपात घडवून आणणाऱ्या संघटनांना अमेरिकेने विदेशी संघटना अजून कायम ठेवले आहे. अशा संघटना कायम कार्यरत असलेल्या देशांना अमेरिकेकडून होत असलेली आर्थिक मदत थांबवण्याची तरतूद यापूर्वीच प्रस्तावित करण्यात आली आहे. फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स’ ने पाकिस्तानला जून 2018 पासून “ग्रे लिस्ट’ मध्ये टाकले आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांना खतपाणी मिळत असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध घातले गेलेले आहेत. “फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स’च्या एशिया पॅसिफिक ग्रुपनेही पाकिस्तानमध्ये दहशतवादी कृत्यांसाठी मनी लॉंडरिंगचा होत असलेला वापर कमी झालेला नाही असे म्हटले आहे. हा देखील पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.