न्यूयॉर्क :- अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात रशियाचा अव्वल टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील गतविजेत्या स्पॅनिश कार्लोस अल्काराझला पराभवाचा धक्का देताना अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आता त्याचा सामना पुन्हा एकदा सर्बियाचा दिग्गज नोवाक जोकोविच याच्याशी होणार आहे.
तिसऱ्या मानांकित मेदवेदेवने आर्थर ऍशे स्टेडियमच्या कोर्टवर तीन तास 19 मिनिटे रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अल्काराझचा 7-6 (7/3), 6-1, 3-6, 6-3 असा पराभव केला. या विजयासह त्याने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतील अल्काराजविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला.
अल्काराझने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत मेदवेदेवचा 6-3, 6-3, 6-3 असा पराभव केला होता. तसेच मेदवेदेवने यापूर्वी 2021 मध्ये, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचचा पराभव करताना त्याच्या विक्रमी ग्रॅंडस्लॅम जेतेपदाच्या आशा धुळीस मिळवल्या होत्या.
पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर मेदवेदेवने दुसरा सेट 6-1 असा सहज जिंकला. यानंतर अल्काराझने तिसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत सामना चौथ्या सेटमध्ये नेला. मेदवेदेवने हा सामना 6-3 असा जिंकला.
मात्र, अलीकडेच सिनसिनाटी मास्टर्सच्या अंतिम फेरीत अल्काराझला एका मजेशीर आणि चुरशीच्या लढतीत पराभूत करणाऱ्या जोकोविचला पराभूत करणे त्याच्यासाठी नक्कीच सोपे असणार नाही.
हा एक आश्चर्यकारक सामना होता. विशेषत: अल्काराझ सारख्या खेळाडूला हरवने आनंद देणारे आहे. या वर्षात दोनदा त्याच्याकडून सहज पराभूत झाल्यामुळे सामन्यापूर्वी माझ्या मनात निश्चितच अनेक शंका होत्या. त्यामुळे मला या सामन्यात 10 पैकी 11 गुण मिळविण्याची कामगिरी करावी लागणार होती. परंतू तिसरा सेट वगळता मी माझ्या क्षमतेनुसार 10 पैकी 12 गुण मिळविणारी कामगिरी केली आहे.
– डॅनिल मेदवेदेव, रशियन टेनिसपटू
दुसरीकडे, जोकोविचने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-3, 6-2, 7-6 असा सलग सेटमध्ये पराभव केला आहे. जोकोविच-मेदवेदेव यांच्यात सोमवारी(ता.11) रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
जोकोविच 24व्या ग्रॅंडस्लॅमसाठी सज्ज
सर्वियन 36 वर्षीय जोकोविच सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शेल्टनविरुद्धचा सामना हा या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील त्याचा 100 वा सामना होता. जोकाविचने जर फायनल सामना जिंकला तर तो टेनिसच्या इतिहासात यूएस ओपन जिंकणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरणार आहे.
यासह, जोकोविचला मार्गारेट कोर्टच्या पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असेल. आपल्या 24व्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदासाठी जोकोविच कोर्टवर उतरणार आहे.
विशेष म्हणजे जोकोविचने त्याच्या शेवटच्या 23 ग्रॅंडस्लॅम उपांत्य फेरीतील 22 सामने जिंकलेले आहेत. त्याने अखेरचे यूएस ओपनचे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते.
दृष्टीक्षेपात
– जोकोविच सातव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत
– जोकोविचला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी
– जोकोविच तिसऱ्यांदा एकाच वर्षी चारही मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत
– चौथ्यांदा एकाच मोसमात तीन ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा जोकोविचचा प्रयत्न