वॉशिंग्टन: करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने आपला ठप्प असलेला सारा कारभार पुन्हा सुरू करण्याच्या संबंधात मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्यांनी हे व्यवहार कशा व किती पद्धतीने खुले करायचे या विषयी निर्णय घेण्याचे अधिकार सर्व प्रांतांच्या गव्हर्नरांना दिले आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे अमेरिका अशी ठप्पच ठेऊन चालणार नाही, करोनाचा अत्युच्च पिरिएड आता संपला असून आता आपल्याला आपला कारभार सुरू करावा लागेल. सर्व एकदमच सुरू होणार नसले तरी आम्ही गव्हर्नरांवर याचा निर्णय सोपवला असून त्यांच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करू. वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचार विनिमय करून आणि कॉमनसेन्स वापरून आम्ही ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आत्तापर्यंत 2 कोटी 20 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था 5.9 टक्क्यांनी घटेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. त्यामुळे यापुढील काळातही अमेरिकेतील बेकारीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला आता कमीत कमी नुकसान होईल, असे धोरण राबवण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. आज अमेरिकेतील सुमारे 33 कोटी जनतेपैकी 95 टक्के जनता गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या संबंधात ट्रम्प प्रशासनाने 18 पानी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यात कमीत कमी उपस्थितीत जास्तीत जास्त व्यवसाय पुन्हा सुरू करणे हे मुख्य सूत्र असणार आहे.