हैदराबाद – गुजरातमधील मोरबी पूल (Gujarat bridge collapse) कोसळण्याच्या प्रकरणाची कालबद्ध न्यायालयीन चौकशीची मागणी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पुन्हा केली आहे.
खरगे (Mallikarjun Kharge) यांनी ट्विट केले की, “सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वात कालबद्ध न्यायालयीन चौकशी हाच या प्रकरणातील तथ्य बाहेर आणण्याचा एकमेव उपाय आहे. झालेल्या जीवितहानीची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
खर्गे आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तेथे राहुल गांधी यांच्या समवेत तेलंगणात एक जाहीर सभाही घेतली. यावेळी खर्गे यांनी टीआरएस पक्षावरही जोरदार टीका केली. मोरबी दुर्घटनेच्या प्रकरणात आम आदमी पक्षाबरोबरच कॉंग्रेस पक्षानेही भाजपच्या विरोधात सध्या आक्रमक भूमिका घेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.