अहमदाबाद :– सेवा संस्थेच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्त्या इला भट्ट (Women’s Rights Activist Ela Bhatt Passes Away) यांचे बुधवारी निधन झाले. गांधीवादी विचारसरणीच्या इला भट्ट यांनी अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले अमिमायी आणि मिहीर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. इला भट्ट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
इला रमेश भट्ट या देशातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. इलाताईंनी स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले. महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी सहकार चळवळीत सहभाग घेतला. सन 1972 मध्ये स्वाश्रय महिला सेवा संघ (सेवा) नावाची संस्था स्थापन केली. सन 1972 ते 1996 त्या संस्थेच्या सरचिटणीस होत्या.
आंतरराष्ट्रीय कामगार, महिलांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता. इला भट्ट यांचा जन्म अहमदाबाद येथे 7 सप्टेंबर 1933 रोजी झाला. त्यांनी 1960च्या दशकात अहमदाबादमधील कापड कामगारांच्या सर्वात जुन्या संघटनांपैकी एक असलेल्या टेक्सटाईल लेबर असोसिएशन (टीएलए)च्या कायदेशीर विभागात त्यांनी प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी कापड बाजारात काम करणाऱ्या स्वयंरोजगार महिलांना संघटित करण्यास प्रवृत्त केले.
इला भट्ट यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राईट लाईव्हलीहुड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. तसेच महिलांचे अधिकार आणि मायक्रो-फायनान्स क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल इला भट्ट यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. सन 2011 मध्ये गांधी शांतता पुरस्कार, 1985 मध्ये पद्मश्री आणि 1986 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.