नगर – स्थापनेचा शतक महोत्सव गाठलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल बॅंकेचा बॅंकिंग व्यवहार करण्याचा परवाना रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी रद्द केल्यानंतर जिल्ह्यात अर्बन बॅंकेच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. 113 वर्षांची बॅंक आता बंद होणार असल्याच्या अफवेने बॅंकेच्या शाखांमध्ये पैशांबाबत चौकशी करण्याची चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान, अर्बन बॅंकेकडे 322 कोटी 59 लाखांच्या ठेवी असून त्या सुरक्षित आहे. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगर अर्बन बॅंकेच्या प्रशासनाने केले आहे.
सन 1910 मध्ये नगर अर्बन बॅंकेची स्थापना झाली होती. त्यानंतर 2013 मध्ये बॅंकेला मल्टीस्टेट बॅंकेचा दर्जा मिळाला होता. सन 2014 पासूनच बॅंकेतील आर्थिक घोटाळ्यांची चर्चा सुरु झाली होती. कर्ज प्रकरणातील अनियमितता व त्यामुळे सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची कर्जे एनपीएमध्ये जाऊन बॅंकेचा एनपीए वाढल्याने 3 ऑगस्ट 2019 पासून बॅंकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यानंतर 2021 मध्ये संचालक मंडळ निवडून झाली. बॅंकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षांची निवड झाल्यावर अवघ्या काही दिवसातच बॅंकेवर निबंध लादण्यात आले होते. 6 डिसेंबर 2021 पासून आजतागायत हे निर्बंध कायम होते. मागील महिन्यातच या निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता रिझर्व्ह बॅंकेने नगर अर्बन बॅंकेचा परवानाच रद्द केला आहे. बॅंकेची ढासळलेली आर्थिक स्थिती, भागभांडवल, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास बॅंक सक्षम नाही, यासह इतर मुद्दे स्पष्ट करून बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
नगर अर्बन बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार गुरुवारपासून बंद झाले आहेत. आता बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेकडून अवसायक नेमला जाणार असून, त्याच्याद्वारे बॅंकेची थकबाकी वसुली करून ठेवीदारांचे पैसे देण्याबाबतची कार्यवाही होणार आहे. मात्र, बॅंकेचे बॅंकींग व्यवहार करण्याचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेने काढून घेतल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आहे.
बॅंकेच्या प्रशासनाने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर अर्बन को. ऑप.बॅंक लि., (मल्टी-स्टेट, शेडयुल्ड बॅंक) संदर्भात भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचे बॅंकींग परवाना दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी कामकाजाच्या वेळेनंतर रद्द केला आहे. बॅंकेवर विश्वास ठेवून बॅंकेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेला पैसा केंद्रीय निबंधक (नवी दिल्ली) यांच्यामार्फत पुढील आदेश आल्यानंतर परत देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. बॅंकेचे 1 लाखापेक्षा जास्त सभासद असून बॅंकेच्या 36 शाखा आहेत तसेच बॅंकेच्या 322 कोटी 59 लाखाच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी बॅंकेकडे ठेवल्या आहेत, त्यांच्या ठेवी सुरक्षित असून केंद्रीय निबंधक कार्यालयाकडून होणाऱ्या पुढील आदेशानुसार कामकाज होईल. ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
सव्वा आठशे कोटींचे येणे
बॅंकेच्या सुमारे 1600 वर थकबाकीदाराकडे सुमारे साडेचारशे कोटींची मुद्दल व त्यावरील व्याज मिळून तब्बल 827 कोटीचे येणे बाकी आहे. याशिवाय डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनने बॅंकेच्या पाच लाखातील सुमारे पंधरा हजारावर ठेवीदारांना त्यांचे पैसे दिले आहेत. ते 294 कोटी रुपये देणे असून त्यापैकी 60 कोटी रुपये बॅंकेने त्यांना दिले आहेत व अजून सुमारे 240 कोटी रुपये देणे आहे तसेच पाच लाखावरील ठेवीदारांनाचेही सुमारे 300 कोटी रुपये देणे आहे. याशिवाय सुमारे पावणे तीनशे कर्मचारी असून त्यांचाही फंड व पगार देणे आहे.