उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाचा पुढाकार
निमोणे – शिरूर तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने निर्वी (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांना ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत कृषी सहायक जयवंत भगत हे विविध पिकाची उत्पादकता वाढीसाठी नेहमीच तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात. अनेक योजना अंतर्गत पिक प्रात्यक्षिक असेल या कामी प्रत्यक्ष शेतावर पाहणी करुन उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग काम करत आहे.
रब्बी हंगामात ज्वारी पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी विभागाच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असून, शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे तसेच झोटोबॅक्टर पीएसबी जीवणू वाटप करण्यात येत आहे. निर्वी येथे माऊली कृपा शेतकरी गट, संत तुकाराम शेतकरी गट, जिजामाता शेतकरी गट, शिवकृपा शेतकरी गट, बालेशा शेतकरी गट, यमाई शेतकरी गट,
गुरुदेव दत्त शेतकरी, गट कार्तिकी शेतकरी गट, नरेंद्र स्वामी शेतकरी गट, जय भवानी शेतकरी गट, शिवाजी राजे शेतकरी गट, महावीर शेतकरी गट अशा विविध गटातील शेतकऱ्यांना व नवीन शेतकरी गट निर्मिती करून सभासदांना बियाणे वाटप करण्यात आले.
निर्वी गावात आठ प्रकल्प
ज्वारी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सुचित्रा या जातीचे एकरी 4 किलो बियाणे दिले असुन बीज प्रक्रिया साठी जीवाणू देण्यात आले आहे. ज्वारी लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले. तण नियंत्रण खत व्यवस्थापन रोपाची संख्या योग्य ठेवण्याकामी विरळणी करणे, तंत्रज्ञान किड व रोग व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. निर्वी गावात आठ प्रकल्प राबविण्यात येत शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर तंतोतंत करावा असे आवाहन केले आहे.