UPSC CSE Result 2023: युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. आदित्य श्रीवास्तव नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये अव्वल ठरला आहे. तर अनिमेष प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे. या परीक्षांमध्ये एकूण १८० उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा आयएएस) साठी निवड झाली आहे.
त्याच वेळी, २०० उमेदवारांची भारतीय पोलीस सेवेसाठी म्हणजेच आयपीएससाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय विदेश सेवेसाठी अर्थात आयएफएससाठी ३७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षांद्वारे केंद्र सरकारच्या विविध अ श्रेणीच्या पदांवर ६१३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ग्रेड बी पदासाठी ११३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मुलाखतीत एकूण 2,800 हून अधिक उमेदवार उपस्थित होते.
युपीएससीने सांगितले की यावर्षी या परीक्षेची मुलाखत ९ एप्रिल २०२४ रोजी संपली. आयएएसच्या मुलाखती४ जानेवारीला सुरू झाल्या आणि ९ एप्रिलपर्यंत चालल्या. एकूण २८०० पेक्षा जास्त उमेदवार वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या मुलाखतींमध्ये उपस्थित होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवडलेल्या उमेदवारांची नावे आणि रोल नंबर त्यांच्या श्रेणीनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा गेल्या वर्षी २८ मे रोजी झाली होती. प्रिलिम्समध्ये यशस्वी झालेले उमेदवार पुढील फेरीत परीक्षेला बसले. नंतर १५ ते २४ सप्टेंबर २०२३ या काळात दोन शिफ्टमध्ये परीक्षांची दुसरी फेरी घेण्यात आली. यूपीएससीने सांगितले की एकूण १०१६ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि केंद्र सरकारच्या विविध सेवांसाठी शिफारस केली गेली आहे.
टॉप 5 रँकमधील 3 उमेदवार आधीच आयपीएस अधिकारी आहेत –
यावर्षी टॉप 5 रँकमध्ये असलेले 3 उमेदवार आधीच आयपीएस अधिकारी आहेत. रँक 1 मिळवणारा आदित्य श्रीवास्तव, रँक 4 पीके सिद्धार्थ रामकुमार आणि रँक 5 रुहानी हे हैदराबादमधील राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये IPS प्रशिक्षण पूर्ण करत आहेत.