इंदोर – केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला. मध्य प्रदेशमध्ये या निकालाबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. असा दावा केला जात आहे की दोन मुली परीक्षेला बसल्या होत्या, त्या दोघींच्याही एकाच रोल नंबरवर मुलाखती घेतल्या आणि आता दोघींनी 184 वा क्रमांक मिळवला आहे. यामध्ये आता कोणाचा दावा खरा आहे, हे तपासानंतरच कळेल. पण सध्या दोन्ही घरी सेलिब्रेशन सुरू आहे.
मंगळवारी निकाल आल्यानंतर आयशा नावाच्या एका मुलीला 184 वा क्रमांक मिळाला आहे. त्यापैकी एक कुटुंब देवासचे आहे, ज्यामध्ये आयशा फातिमाने (वडील नजीरुद्दीन) 184 वा क्रमांक मिळाला आहे. दुसरे कुटुंब अलीराजपूर जिल्ह्यातील आयेशा मक्राणी (वडील सलीमुद्दीन) हिचे आहे, आणि तिलाही 184 वा क्रमांक मिळाला आहे. दोघींचाही रोल नंबर एकच असल्याने निकालात चूक झाली आहे. प्रवेशपत्रात फक्त एकच रोल नंबर 7811744 असा नमूद आहे. दोघींनाही एकच रोल नंबर दिला गेल्याने हा गोंधळ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. मात्र, या दोघींनीही परीक्षा दिल्याचा दावा केला असून आपणच मुलाखत दिल्याचा पुरावाही दोघींकडून सादर केला जात आहे.
आयोगाने म्हटले आहे की, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आम्ही दोघींचे प्रवेशपत्र तपासले. सर्वप्रथम, आयेशा मक्राणीच्या प्रवेशपत्रावर व्यक्तिमत्व चाचणीची तारीख 25 एप्रिल आणि गुरुवार असा दिवस लिहिला होता. तर आयेशा फातिमाच्या कार्डवर व्यक्तिमत्त्व चाचणीची तारीख 25 एप्रिल असली तरी दिवस मंगळवार होता. प्रत्यक्षात 25 एप्रिल रोजी मंगळवार होता. मात्र, आयेशा मक्राणीच्या भावाने या संदर्भातील अन्य कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. त्याने यूपीएससीकडून आलेला मेल दाखवला. ज्यामध्ये असे लिहिले होते की, एकसारखे नाव असल्याने तुमचे नाव बदलले गेले आहे. तीन उमेदवारांच्या नावात साम्य असल्याने दोन उमेदवारांची नावे बदलण्यात आली आहेत. पूर्ण नाव बदलले नाही तुमचे नाव बदलून आयेशा फातिमा (आयशा मक्राणी) असे ठेवण्यात आले आहे.
दुसरे म्हणजे देवासच्या आयेशाच्या प्रवेशपत्रावर यूपीएससीचे वॉटर मार्क आहे. तर अलीराजपूरच्या आयशाचे प्रवेशपत्र साध्या कागदावर छापल्यासारखे दिसते.
तिसरे कारण म्हणजे देवासच्या आयेशाच्या ऍडमिट कार्डमध्ये क्युआर कोड आहे, जो स्कॅनिंग केल्यावर ऍडमिट कार्डमध्ये लिहिलेली माहिती दाखवतो. अलीराजपूरच्या आयेशाच्या प्रवेशपत्रात क्यूआर कोड नाही. आता या वादावर आयोग काय तोडगा काढते, याकडे लक्ष लागले आहे.