सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; मास्क, सॅनिटायझर बंधनकारक
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे “यूपीएससी’ची परीक्षा नियोजित वेळेतच म्हणजेच येत्या रविवारी (दि.4) होत आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याचे सूचना दिल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी झाली. अखेर न्यायालयात यूपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत परीक्षा वेळेतच घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता उमेदवारांना करोनाच्या सर्व नियम पाळून परीक्षा देणे आवश्यक बनले आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी काय दक्षता घ्यावी, याबाबतची सूचना “यूपीएससी’ने दिल्या आहेत.
“यूपीएससी’ची सकाळच्या सत्रात 100 प्रश्न अन् 200 गुणांची परीक्षा, तर दुपारच्या सत्रात 80 प्रश्न अन् 200 गुणांची परीक्षा असेल. या परीक्षेसाठी उमेदवारांनी हॉल तिकीट डाऊनलोड केले आहेत. या परीक्षेत सर्व उमेदवारांना मास्क बंधनकारक आहे. मास्क नसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा काळात वापरण्यासाठी छोट्या आकाराचे पारदर्शी हॅण्ड सॅनिटायझर आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रात उशिरा येणाऱ्या उमेदवारांना कसल्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. सकाळी पहिला पेपर 9:30, तर दुसरा पेपर 2:30 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर उमेदवारांनी परीक्षा केंद्रात उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश केंद्र बंद केले जाणार आहे. त्यामुळे वेळेत परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.
करोना संकटात जोखीम नको…
सध्या राज्यासह करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात परिसरातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा परिस्थितीत जास्त जोखीम नको म्हणून या परीक्षेला बसणार नाही. परीक्षा येत्या रविवारी होत आहे. मात्र, त्यानंतर चार-पाच महिन्यांत यूपीएससी परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेची तयारी करीत असल्याचे एका उमेदवाराने सांगितले.