वेल्हे- वाजेघर, रांजणे, वांगणी, खामगांव आदी परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. जोपर्यंत परिसरातील पाण्याचा प्रश्न प्रशासन सोडवत नाहीत. तोपर्यंत धरणातील पाण्याचा एकही थेंब पुरंदरला देणार नसल्याचा पवित्रा वेल्हेकरांनी घेतला आहे. वेल्हेकरांचा हा वाढता विरोध पाहता संघर्षाची नांदी ठरत आहे. तीन तालुक्यांसाठी संवेदनशील असलेला गुंजवणीचा पाणीप्रश्न पेटला आहे.
गुंजवणी धरणाची पाणी क्षमता ही 3.69 आहे. या धरणाचे पाणी जर पुरंदरला मिळत असेल आणि वेल्हेकरांना मिळत नाह, अशी अवस्था असेल तर धरण उशाला आणि कोरड घशाला असे वेल्हेकरांचे झाले आहे. वेल्हेकरांचे हक्काचे पाणी असून फक्त 0.12 टीएमसी मिळणार आहे. पुरंदरला मात्र सगळ्यात जास्त 2.02 टीएमसी पाणी मिळणार आहे. भूमिपुत्रांना जर पाण्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागत असेल तर ही गंभीर बाब आहे.
पुरंदर पाणी योजनेसाठी गुंजवणी धरणाचे बंद पाइपलाइनद्वारे नेण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी वेल्हे तालुक्यात दोन दिवसांपासून कंटेनर भरून पाईप येत होते. गुरूवार (दि.1) तालुक्यातील नागरिकांनी याची चौकशी करता पुरंदरला नेण्यात येणाऱ्या बंद पाइपलाइनसाठी काम सुरू झाल्याचे समजताच वेल्हेकर व कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत प्रकल्पास तीव्र विरोध करीत आंदोलन केले. हे काम थांबवण्यास भाग पाडले आहे. कंटेनरचा पाइप परत पाठवल्याने वातावरण चांगलेच तापलेले आहे. कंटेनर भरून आलेले पाइप परत पाठवल्यानंतर दोन दिवस उलटूनही यावर निर्णय झाला नाही.
वांगणी व वाजेघर भागात पाण्याचे वाटप होणार की नाही. आणि झाले तर कसे होणार याबाबत अजून स्पष्ट झाले नाही. हे जर स्पष्ट झाले नाही तर मावळ तालुक्यातील पवना धरणाचे पाणी पिंपरी चिंचवडला नेणाऱ्या बंद पाइपलाइनला विरोध करताना काही शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. अशी परिस्थिती निर्माण होईल काय, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वेल्हेकर पाण्यासाठी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
वेल्हेकरांच्या मागण्या
गुंजवणी प्रकल्पातून वेल्हेकरांना पहिले पाणी, नंतर पुरंदरला.
वाजेघर खोऱ्यातील व वांगणी खोऱ्यातील पाणी वाटपाचे नियोजन कसे करणार ते स्पष्ट करणे
गुंजवणी धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले असून धरणग्रस्तांना जागा कधी देणार याबाबत स्पष्टता करणे.
गुंजवणी नदीच्या कडेला अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करावा.
पाणीवाटप व लाभक्षेत्र
वेल्हे तालुक्यासाठी- 0.12 टीएमसी, 850 हेक्टर लाभक्षेत्र.
भोर तालुक्यासाठी- 1.40 टीएमसी, 9435 हेक्टर लाभक्षेत्र.
पुरंदर तालुक्यासाठी – 2.02 टीएमसी, 11107 हेक्टर लाभक्षेत्र.